केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार आज अखेर झाला. एकूण ४३ मंत्र्यांनी आज शपथ घेतली असून यामध्ये महाराष्ट्रातील ४ मंत्र्यांचा समावेश आहे. मात्र, त्याआधी विद्यमान मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. या रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, रमेश पोखरियाल, संजय धोत्रे, थावरचंद गेहलोत, सदानंद गौडा या मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. मात्र, त्यासोबतच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचा देखील राजीनामा घेण्यात आला. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. करोना काळामध्ये हर्ष वर्धन यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात असताना आज त्यांचा राजीनामा घेतल्यामुळे त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

डॉ. हर्ष वर्धन यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसकडून त्यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “डॉ. हर्ष वर्धन यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आल्याने करोना हाताळण्यात आलेले अपयश आणि लाखो लोक मरण पावले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त केल्याला जबाबदार असल्याची कबुली मोदी सरकारने दिली आहे. असो, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारातून महाविकासआघाडी सरकार आधी होतं, त्यापेक्षा अधिक मजबूत झालं आहे”, असं ट्वीट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता विरोधकांकडून भाजपावर खोचक टीका व्हायला सुरुवात झाली आहे.

 

दरम्यान, हर्ष वर्धन यांचा राजीनामा घेण्याआधी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी तशी मागणी केली होती. “मंत्रिमंडल का नहीं, सत्ता ती भूख का विस्तार हो रहा है. अगर मंत्रिमंडळ का विस्तार परफॉर्मन्स और गवर्नन्स के आधार पर हो तो सबसे पहले देश के स्वास्थ्य मंत्री को हटाया जाए जिनकी नाकामी की वजह से लोग वॅक्सिन, दवाइयों, ऑक्सिजन की कमी से तिल तिल कर मरने को मजबूर हुए”, असं ट्वीट रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केलं होतं.

 

हर्ष वर्धन यांचा राजीनामा

या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्यमंत्रीपदाचा हर्ष वर्धन यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या जाही मनसुख मांडवीय यांच्याकडे केंद्रीय आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.