आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात शनिवारी वाशिम जिल्ह्यापासून होत असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील बडे नेते या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
पक्षाच्या वतीने मुंबई वगळता ३३ जिल्ह्यांमध्ये १०० सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातही सभांचे आयोजन केले जाणार आहे. केंद्रातील यूपीए आणि राज्यातील आघाडी सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेला व्हावी, हा मूळ उद्देश असल्याचे पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. वाशिममध्ये सकाळी पहिली सभा होणार असून, दुपारी अकोल्यात सभा होईल. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदी नेतेही उपस्थित राहणार आहेत. फेब्रुवारी अखेपर्यंत राज्यात ४८७७ सभांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यांमधील सभांमध्ये स्थानिक पातळीवरील नेतेमंडळी सहभागी होतील.
आघाडीत काँग्रेसच्या वतीने सर्व जागा लढविणार नसल्या तरी सर्व ४८ मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या वतीने राज्यात सर्वच मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, या दृष्टीनेच नियोजन करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा