मुंबई : नरेंद्र मोदी एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून २००२ या वर्षी गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीनंतर उदयाला आले. या दंगलीत मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांची जगाला, देशाला ओळख झाली. भाजपकडून अल्पसंख्याकांना तिकीट देताना, मंत्रीपद देताना दुजाभाव केला जातो. त्यांची मुस्लीमविरोधी वक्तव्ये पाहिल्यानंतर ‘सौगात-ए-मोदी’ म्हणजे ‘सौ चुहे खा के बिल्ली हज को चली’, असे असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला आहे.
रमजान ईदनिमित्त भाजप ३२ लाख मुस्लीम कुटुंबांना ‘सौगात-ए-मोदी’ देणार असल्याच्या मुद्द्यावर सपकाळ यांनी टीका केली. ही ‘सौगात’ देत असताना दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दीडपट भाव देणार, विदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, पेट्रोल ४० रुपये तर डिझेल ३५ रुपये लिटरने देणार, अशी आश्वासने २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिली होती, त्या ‘सौगात’ची देश आजही वाट पहात आहे, असेही सपकाळ म्हणाले.
संघटनात्मक फेरबदल काँ
ग्रेसमधील मरगळ झटकण्यासाठी मोठे फेरबदल केले जाणार आहेत. नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासाठी जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ नेत्यांवर निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांच्या अहवालानुसार हे फेरबदल केले जाणार आहेत. रिक्त पदांवरही नियुक्त्या होणार असून अनेक वर्षांपासून एकाच पदावर असणाऱ्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. यासंदर्भात नियुक्त केलेल्या निरीक्षकांची बैठक शुक्रवारी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.