मुंबई : मध्य भारत आणि गोव्याचे कोणतेही सांस्कृतिक संबंध नाहीत किंवा भाजीपाला, अन्नधान्य अशा जीवनावश्यक वस्तूंचा एकमेकांना पुरवठा केला जात नाही. तरीही केवळ उद्याोगपतींच्या फायद्यासाठी नागपूर ते गोवा शक्तिपीठ मार्ग उभारण्याचा घाट महायुती सरकारने घातल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यात काँग्रेसचे पुनरूज्जीवन करण्यावर सपकाळ यांनी भर दिला आहे. या अनुषंगाने पक्षापुढील आव्हाने, विधिमंडळात काँग्रेसची भूमिका, प्रस्तावित शक्तिपीठ मार्ग, सध्याची राजकीय परिस्थिती यावर त्यांनी भाष्य केले. महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ मार्गास काँग्रेसचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ उद्याोगपतींच्या फायद्यासाठीच हा महामार्ग उभारण्याची योजना असल्याचा आरोप त्यांनी केला. मध्य भारतातून मालाची बंदरापर्यंत वाहतूक करण्याकरिता हा महामार्ग उभारण्यात येणार आहे. नागपूरजवळील गडचिरोली हे स्टील नगरी म्हणून विकसित करण्यात येत आहे. पुढे लागूनच दंतेवाडा, ओडिशा आहे. तेथेही विपुल खनीज संपत्ती आहे. चंद्रपूरमध्ये लोह धातूचा साठा आहे. भंडारा, गोंदियातही खनिज उद्योग येत आहेत. दापोली, राजापूरमध्येही खनिजे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या भागात नव्याने सुरू होणाऱ्या उद्योगांना त्यांचा माल कमी वेळेत बंदरापर्यंत नेता यावा, या उद्देशानेच हा महामार्ग उभारण्यात येत आहे. परंतु कोणत्या ‘तीर्था’साठी लोकांना गोव्याला पाठविण्यात येणार आहे, असा खोचक सवालही सपकाळ यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

औरंगजेब आणि फडणवीस सरकारच्या कारभाराची तुलना केल्याबद्दल आपल्यावर टीका करण्यात येत असली तरी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. औरंगजेब एखाद्या घरासमोरून गेला आणि कोणी प्रतिसाद दिला नाही तर त्याचे सैनिक जाऊन घर पाडायचे. महायुती सरकारचा कारभार काही वेगळा नाही. त्यांच्या टोळ्या जाऊन बांधकामांवर हातोडा घालतात. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे मालवण, नागपूर आणि कुणाल कामरा याच्या स्टुडिओचे देता येईल. मुंबईसह सर्व शहरांमध्ये महापालिकांची मुदत संपून तीन वर्षे पूर्ण झाली. काही महापालिकांमधील लोकप्रतिनिधींची कारकीर्द पाच वर्षांपूर्वी संपली. अजूनही निवडणुका घेतल्या जात नाहीत. निरंकुश सत्ता आपल्या हाती राहावी या उद्देशानेच महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर जाव्यात, असाच प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘आयोगाऐवजी शहाफडणवीसांकडून खुलासे’

लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यात ७६ लाख मतदारांच्या संख्येत वाढ झाली. महायुती आणि महाविकास आघाडीत नेमका एवढ्याच मतांचा फरक आहे. मतदारांच्या संख्येत एवढी वाढ कशी झाली याबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोगाकडून योग्य खुलासा केला जात नाही. काँग्रेसच्या आक्षेपावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुलासे करतात. निवडणूक आयोगाकडून उत्तर अपेक्षित असताना शहा-फडणवीस यांच्याकडून विधाने होत असल्याने संशयाला पुष्टी मिळते, असेही सपकाळ म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress state president harshvardhan sapkal talk about shaktipeeth highway in loksatta lok samvad event zws