मुंबई : राज्यात २०१९ ते २०२४ या पाच वर्षांत राज्यात ३२ लाख मतदार वाढले होते. पण लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत ४८ लाख मतदारवाढ दाखविण्यात आली. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली असता त्यांनी अद्याप दिलेली नाही. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली असून मतदार याद्यांतील भरमसाट वाढ अनाकलनीय आहे, असा आरोप काँग्रेसच्या सांख्यिकी विश्लेषण विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी केला. शनिवारी गांधी भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी खासदार कुमार केतकर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या ९.७ कोटी असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले होते, पण केंद्रातील मोदी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने मात्र महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील प्रौढ लोकसंख्या ९.५४ कोटी सांगितली होती. याचा अर्थ मतदारयाद्यांत घोळ होता. शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात एकाच इमारतीत ५ हजार मतदारांची नोंदणी केली. मतदार याद्यांत ही सर्व घुसडवलेली नावे राज्याबाहेरची होती.
गुंतवणुकीत पुढे मग दरडोई उत्पन्नात पिछाडी का ?
दावोस दौऱ्यामध्ये महाराष्ट्राने १६ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले असून विदेशी गुंतवणकीत महाराष्ट्र अव्वल असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. राज्यात इतकी गुंतवणूक होत असताना दरडोई उत्पन्नात राज्य १२ व्या क्रमांकावर का गेले आहे, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केला.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जे विदेशी गुंतवणुकीचे करार झाले होते, त्याची वस्तुस्थिती सरकारने जनतेसमोर ठेवावी. गुंतवणुकीत राज्य अव्वल आहे, मग बेरोजगारी का वाढते आहे. गुंतवणुकीचे आकडे फुगवून सांगून राज्यातल्या बेरोजगार तरुणांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यात येत आहे. सेमी कंडक्टरचा एकतरी प्रकल्प या गुंतवणूक करारात आहे का, हा प्रकल्प महाराष्ट्रात का येत नाहीत? दावोस दौऱ्यातील गुंतवणुकीसंदर्भात महायुती सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी काँग्रेसची मागणी आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
काँग्रेसचे राज्यभर आंदोलन
शनिवारी काँग्रेसने निवडणूक आयोग आणि भाजपविरोधात राज्यभर आंदोलन केले. यवतमाळमध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापुरात खासदार विशाल पाटील तर अहिल्यानगरमध्ये प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी भाजप हा निवडणूक आयोगाच्या मदतीने लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप केला.
राष्ट्रीय मतदारदिनी निवडणूक आयोगाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत, पण महाराष्ट्रातील जनता त्यांना शुभेच्छा देऊ इच्छित नाही, निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे. विधानसभेतील महाविकास आघाडीच्या १०० पराभूत उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. – पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील १३२ विधानसभा मतदारसंघात २० ते २५ हजार नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत ६२ विधानसभा मतदारसंघात महायुती आघाडीवर होती. पण विधानसभेला या १३२ मतदारसंघात ११२ जागांवर महायुतीचा विजय झाला. यासंदर्भात निवडणूक आयोग काहीही माहिती देण्यास तयार नाही.– प्रवीण चक्रवर्ती, अध्यक्ष, सांख्यिकी विश्लेषण विभाग, काँग्रेस