दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होत असला तरी राज्याच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत एकत्र असलेल्या पण कायम वाद घालणाऱ्या शिवसेना आणि भाजपच्या भांडणाचा तिसऱ्याला फायदा होताना दिसत नाही. यातूनच स्वत:चे स्थान निर्माण करण्याचे मोठे आव्हान मुंबईत काँग्रेसपुढे आहे. म्हणूनच खड्डे किंवा विविध नागरी समस्यांचे मुद्दे हाती घेऊन लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न काँग्रेसला करावा लागत आहे.
गेल्या २० वर्षांमध्ये काँग्रेसला मुंबईत कधीच सत्तेच्या जवळ जाता आलेले नाही. २००७ मध्ये गुरुदास कामत अध्यक्ष असताना त्यांनी जोर लावला होता. पण तेव्हाही शिवसेना-भाजपने निसटता विजय मिळविला होता. २०१२ मध्ये काँग्रेसला पन्नाशी गाठता आली. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती आल्यापासून संजय निरुपम यांनी सत्ता हस्तगत करण्याच्या उद्देशाने जोर लावला. शिवसेना व भाजप युतीच्या विरोधात रणशिंग फुंकले. महापालिकेतील भ्रष्टाचार, नागरी समस्यांचा अभाव, विविध प्रश्न हाती घेऊन आंदोलने सुरू केली. अगदी मंगळवारी सर्व प्रभागांमध्ये खड्डय़ांवरून आंदोलन केले. मुंबईत काँग्रेस सर्वत्र पोहचली पाहिजे यावर निरुपम यांचा भर आहे. शिवसेना व भाजपमधील भांडणामुळे काँग्रेसची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे.
शिवसेना व भाजपमधील दररोजच्या वादातून हे दोन्ही पक्ष महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढतील, असे एकूण चित्र आहे. शिवसेनेची सत्ता असताना महापालिकेत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे चित्र मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी तयार केले आहे. भाजपने मुंबईच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. शिवसेना आणि भाजप वेगळे लढल्यास मागे फेकले जाऊ, अशी काँग्रेसला भीती आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले त्यातून दोघांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस झाली. काँग्रेस व राष्ट्रवादीची पार पिछेहाट झाली. याचीच पुनरावृत्ती मुंबईत होऊ शकते, अशी काँग्रेसला भीती आहे.
अन्य भाषकांकडे लक्ष
भाजपने वेगळी चूल मांडल्यास गुजराती, उत्तर भारतीय व अन्य भाषकांची मते भाजपकडे वळतील. युती म्हणून एकत्र लढल्यास यातील काही मते काँग्रेसला मिळू शकतात. काँग्रेसची भिस्त झोपडपट्टीवासीय, मुस्लीम मतांवर आहे. मुस्लीम मतांचे काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी आणि एमआयएममध्ये विभाजन होऊ शकते. उत्तर भारतीयांची मते एकगठ्ठा भाजपकडे जाऊ नये, असा निरुपम यांचा प्रयत्न राहील.
निरूपम म्हणतात, यंदा सत्तापरिवर्तन
शिवसेना आणि भाजपच्या भांडणात काँग्रेसचे अधिक नुकसान झाले आहे. ‘मुंबईत काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत. तसेच शिवसेना आणि भाजप एकमेकांवर कुरघोडी करीत असले तरी दोन्ही पक्ष गेली २० वर्षे सत्तेत एकत्र आहेत. मुंबईची सध्याची अवस्था लक्षात घेता मुंबईकरांना सारे कळून चुकले आहे. शिवसेना आणि भाजप कितीही भांडले तरी आतून ते एकत्रच आहेत. यामुळेच मुंबईत यंदा निश्चितच सत्ता परिवर्तन होईल, असा विश्वास संजय निरुपम यांना आहे.