काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे गुजरातमध्ये ज्या पद्धतीने प्रचार करत आहेत आणि भाषणे देत आहेत त्यावरून त्यांच्यात देशाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झाली आहे असे दिसून येत असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले. ‘आजतक’ या वृत्तवाहिनीने ‘मंथन आजतक २०१७’ हा कार्यक्रम आयोजित केला. त्यातील मुलाखतीत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मुलाखत घेण्यात आली.
या कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत विनोद तावडे आणि संजय राऊत या दोघांनाही भाजप आणि शिवसेनेच्या सध्याच्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. भाजपसोबत आमची युती तीन दशकांची आहे. त्यांचे काही मुद्दे आम्हाला पटले नाही तर आम्ही ते स्पष्ट बोलून दाखवतो असे संजय राऊत यांनी म्हटले. तर दोन्ही पक्षांचे धोरण काही प्रमाणात वेगळे असले तरीही मागील ३ वर्षांच्या कार्यकाळात कॅबिनेटच्या बैठकीत कोणतेही मोठे मतभेद झालेले नाहीत असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.
जीएसटी लागू झाल्याने लघू आणि मध्यम व्यापाऱ्यांना त्रास होतो आहे. नोटाबंदी आणि जीएसटी या मोदी सरकारच्या निर्णयामुळे जनता नाराज झाली आहे असेही राऊत यांनी स्पष्ट केले. तर भाजप महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर उभे राहण्यासाठीच प्रयत्न करेल आम्हाला शिवसेनेची गरज भासणार नाही अशीच आमची रणनीती असणार आहे असे तावडे यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांना पप्पू म्हणणे चूक आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये ते आत्ता प्रभावीपणे काम करत आहेत. देशाच्या जनतेपेक्षा मोठे कोणीही नाही. ही जनता हवे त्याला पप्पू बनवू शकते असाही टोला राऊत यांनी लगावला.