स्वातंत्र्यलढय़ातील ‘चले जाव’ चळवळीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वैचारिक गुरू गोळवलकर गुरुजी यांचा विरोध असल्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट क्रांती दिनी मुंबईत हजर राहणे टाळले, असा आरोप करीत, राज्यातील सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांनाही प्रदेश काँग्रेसने धारेवर धरले आहे. राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर संघाशी संबंधित शासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांसंदर्भात वेगळा विचार केला जाईल, असा इशाराही काँग्रेसने दिल्याने, क्रांती दिनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू झालेले राजकारण अद्यापही धगधगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातील एका पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्त्यांनी संघ आणि भाजप संबंधांवर यथेच्छ टीका केली.
असहकार आंदोलन आणि चले जाव चळवळ या भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील महत्त्वाच्या घटना असताना संघाने मात्र या आंदोलनांबाबत स्वातंत्र्यानंतरही सातत्याने विरोधाचीच भूमिका घेतली होती, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. चले जाव चळवळीचा प्रारंभ मुंबईत झालेला असल्याने या आंदोलनाचा महाराष्ट्राला अभिमान आहे. त्यामुळेच दर वर्षी ९ ऑगस्टला राज्याचे मुख्यमंत्री ऑगस्ट क्रांती मैदानावर उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन करतात. परंतु संघाच्या विचारांचा प्रभाव असल्याने या वर्षी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र ही प्रथा मोडली, असा आरोपही त्यांनी केला.
संघाची विचारधारा पसरवण्याचे काम’
भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून संघाची विचारधारा घुसविण्याचे काम सर्वत्र सुरू आहे. संघाच्या विचारांचा प्रचार करणाऱ्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतून आता शासकीय कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. या संस्थेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह विनोद तावडे, चंद्रकांत पाटील हे मंत्री पदाधिकारी असताना या घडामोडी घडतात हे सूचक आहे, असेही सावंत म्हणाले.

Story img Loader