भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभार करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या कार्याचा काँग्रेसला चांगलाच राजकीय लाभ होऊन आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून सर्वाधिक खासदार काँग्रेसेचच निवडून येतील तसेच विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस सत्तेत येईल, असा विश्वास प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीस तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात ठाकरे यांच्या हस्ते चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वनेमंत्री डॉ. पतंगराव कदम, पक्षाचे सचिव वाल्मिकी यांच्यासह आमदार, नेते उपस्थित होते. मुंबईसह राज्याच्य ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले. मुक्त मार्ग, मेट्रो किंवा मोनो यासारख्या सुरू होणाऱ्या प्रकल्पांमुळे मुंबईवरील ताण कमी होईल. शेतीसाठी ठिबक सिंचन योजना किंवा सिमेंट बंधारे ही कामे शेतकऱ्यांना निश्चितच लाभदायक ठरतील, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना गेल्या तीन वर्षांंत पक्षाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचेच आभार मानले. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा आहे. अशा वेळी जातीयवादी पक्षांचे आव्हान समोर ठाकले असताना त्याचा मुकाबला करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले. लोकसेवा ही काँग्रेसचा परंपरा असून त्यानुसारच काम केले. महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. राज्यातील ८२ टक्के शेती ही पावसावर अवलंबून असल्याने या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात अधिकाधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करीन, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यानिमित्त प्रदेश काँग्रेसच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या वचनपूर्ती तीन वर्षांची या पुस्तिकेचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.