मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यातील शीतयुद्ध शुक्रवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोरच भडकले. मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या तक्रारींमागे मोहन प्रकाश यांची फूस असल्याची चर्चा असतानाच त्यांच्याच विरोधात कार्यकर्त्यांनी एकच हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री चव्हाण आणि राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश हे दोघेही राहुल गांधी यांचे जवळचे मानले जातात. मुंबईतील पक्षसंघटनेचा आढावा घेण्याकरिता टिळक भवनात  राहुल गांधी यांची खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच काही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दलच तक्रारींचा पाढा वाचला. मुख्यमंत्रीविरोधातील मोहिमेचा भाग म्हणूनच राहुल गांधी यांचा हा दौरा आयोजित करण्यात आल्याची चर्चा होती. मोहन प्रकाश हे राहुल गांधी यांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे.
धारावी पुनर्विकासावरून खासदार एकनाथ गायकवाड, महिला व बालविकासमंत्री वर्षां गायकवाड आणि जिल्हाध्यक्ष मेहता यांनी तक्रार केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी धारावीचा दौरा केला होता. अल्पसंख्याक, दलित असे पक्षाचे पारंपारिक मतदार असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाला विलंब लागत असल्याबद्दल गायकवाड व मेहता यांनी नाराजी नोंदविली. राहुल गांधी यांनी लगेचच मुख्यमंत्र्यांना बोलावून घेतले. मुख्यमंत्र्यांनी विलंबमागची कारणे स्पष्ट केली. हा प्रकल्प ठेकेदाराच्या की रहिवाशांच्या फायद्याचा राबवायचा, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. ठेकेदारांची तळी उचलणाऱ्या स्वपक्षीयांना कानपिचक्या देतानाच खा. गायकवाड आणि त्यांची मंत्री कन्या यांना योग्य तो संदेशही दिला. जास्तीत जास्त लोकांना घरे देण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी हा प्रकल्प वेगात राबवावा, अशी सूचना केली.
राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या कार्यपद्धतीबद्दल नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे. त्याचाही उद्रेक राहुल गांधी यांच्या समक्षच झाला. जनता दलात असताना मोहन प्रकाश हे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या विरोधात बोलायचे. हेच मोहन प्रकाश राज्याचे प्रभारी कसे, असा सवाल मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष वसंत ननावरे यांनी करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. यामुळे मोहन प्रकाश हे अस्वस्थ झाले होते.

दौऱ्यामुळे वाहतूक कोंडी
काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने मुंबईकरांना बराच त्रास सहन करावा लागला. दादरसह पश्चिम उपनगरातील नागरिकांना तब्बल दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. राहुल गांधी सकाळी सव्वाआठच्या सुमारास सांताक्रूझ विमानतळावर उतरले. ते येण्याआधी बराच वेळ विमानतळावरील वाहतुकीवर र्निबध होते. रिक्षा-टॅक्सी पोलिसांकडून रोखून धरण्यात आल्या होत्या. विमानतळ ते टिळकभवन रस्त्यावर विशेष सुरक्षा पथक (एसपीजी) च्या देखरेखीखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ते त्या रस्त्यावरून जाण्याआधी तासभर अन्य वाहनांना वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावर वाहनांची रांगच रांग लागली. अंधेरी ते दादर प्रवासासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागत होता. हीच परिस्थिती गांधी सायंकाळी विमानतळावर रवाना होतानाही झाली. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करीत कार्यालय गाठावे लागले आणि घरी परतावे लागले.

राहुल दुष्काळी भागांत जाणार
राज्यातील दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुक्रवारी दिल्या. राज्यातील काही भागांत भीषण दुष्काळ असून या भागाचा आपण स्वत लवकरात लवकर दौरा करणार असल्याचे गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा झाली असून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबतही निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाल़े

गुरुदास कामत गैरहजर
काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येऊनही काँग्रेसचे खासदार गुरुदास कामत मात्र तब्येत बिघडल्याचे कारण सांगून टिळक भवनात झालेल्या बैठकीस अनुपस्थित राहिले. पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेबाबत ते नाराज असून त्यांचे काही समर्थक नगरसेवकही या बैठकीपासून लांब राहिले होत़े