मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यातील शीतयुद्ध शुक्रवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोरच भडकले. मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या तक्रारींमागे मोहन प्रकाश यांची फूस असल्याची चर्चा असतानाच त्यांच्याच विरोधात कार्यकर्त्यांनी एकच हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री चव्हाण आणि राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश हे दोघेही राहुल गांधी यांचे जवळचे मानले जातात. मुंबईतील पक्षसंघटनेचा आढावा घेण्याकरिता टिळक भवनात राहुल गांधी यांची खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच काही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दलच तक्रारींचा पाढा वाचला. मुख्यमंत्रीविरोधातील मोहिमेचा भाग म्हणूनच राहुल गांधी यांचा हा दौरा आयोजित करण्यात आल्याची चर्चा होती. मोहन प्रकाश हे राहुल गांधी यांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे.
धारावी पुनर्विकासावरून खासदार एकनाथ गायकवाड, महिला व बालविकासमंत्री वर्षां गायकवाड आणि जिल्हाध्यक्ष मेहता यांनी तक्रार केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी धारावीचा दौरा केला होता. अल्पसंख्याक, दलित असे पक्षाचे पारंपारिक मतदार असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाला विलंब लागत असल्याबद्दल गायकवाड व मेहता यांनी नाराजी नोंदविली. राहुल गांधी यांनी लगेचच मुख्यमंत्र्यांना बोलावून घेतले. मुख्यमंत्र्यांनी विलंबमागची कारणे स्पष्ट केली. हा प्रकल्प ठेकेदाराच्या की रहिवाशांच्या फायद्याचा राबवायचा, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. ठेकेदारांची तळी उचलणाऱ्या स्वपक्षीयांना कानपिचक्या देतानाच खा. गायकवाड आणि त्यांची मंत्री कन्या यांना योग्य तो संदेशही दिला. जास्तीत जास्त लोकांना घरे देण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी हा प्रकल्प वेगात राबवावा, अशी सूचना केली.
राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या कार्यपद्धतीबद्दल नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे. त्याचाही उद्रेक राहुल गांधी यांच्या समक्षच झाला. जनता दलात असताना मोहन प्रकाश हे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या विरोधात बोलायचे. हेच मोहन प्रकाश राज्याचे प्रभारी कसे, असा सवाल मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष वसंत ननावरे यांनी करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. यामुळे मोहन प्रकाश हे अस्वस्थ झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा