मुंबई : शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना नाटक, कलेची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी नरिमन पॉईंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस््तर्फे (एनसीपीए) कनेक्शन इंडिया फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये मुंबईतील १६ शाळांची निवड करण्यात आली असून त्यात महानगरपालिकेच्या सहा शाळांचा समावेश आहे. फेस्टिव्हलमध्ये यूके येथील नॅशनल थिएटरही सहभागी झाले आहे. या फेस्टिवलमुळे शालेय विद्यार्थ्यांना रंगमंचाची ओळख होणार आहे.

नरिमन पॉईंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस््तर्फे नाट्यसृष्टीशी निगडित विविध महोत्सव, कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. यंदा एनसीपीएमध्ये १६ जानेवारी ते १९ जानेवारी, तसेच २३ ते २६ जानेवारी या कालावधीत ‘कनेक्शन इंडिया फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये मुंबईतील १६ शाळांची निवड करण्यात आली आहे. यात पालिकेच्या सहा शाळेतील विद्यार्थ्यांनाही कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, फेस्टिव्हलमध्ये १६ शाळांसह मुंबईतील महाविद्यालये, सेवाभावी संस्था सहभागी होणार आहेत. या फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागातील गोविंदनगर मुंबई पब्लिक स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘बॅक इन द डे’ कार्यक्रम सादर केला. तसेच, १८ जानेवारी रोजी के पश्चिम विभागातील डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूल शाळेचे विद्यार्थी ‘पूरवैय्या’, १९ जानेवारी रोजी एफ दक्षिण विभागातील अभ्युदय नगर मुंबई पब्लिक शाळेचे विद्यार्थी ‘सुपरग्ल्यू’, २३ जानेवारी रोजी जी दक्षिण विभागातील सीताराम मील कंपाऊंड मुंबई पब्लिक शाळेचे विद्यार्थी ‘एपिक’, २४ जानेवारी रोजी पी उत्तर विभागातील चिंचवली मुंबई पब्लिक शाळेचे विद्यार्थी ‘रिमोट’ आणि २६ जानेवारी रोजी एच पूर्व विभागातील खेरवाडी मुंबई पब्लिक शाळेचे विद्यार्थी ‘एज इज रिव्होल्टिंग’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

हेही वाचा…टाटा मुंबई मॅरेथाॅनसाठी विशेष लोकल सेवा

या नाटकांतून सुख-दु:खाच्या रंगछटा, यश आणि वातावरण बदल आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. नाटकांचे दिग्दर्शन कसे करावे, नेपथ्याची मांडणी, कलागुणांना वाव देणे, सांघिक प्रयत्न आणि उत्तम सादरीकरण आदी विषय विद्यार्थ्यांना या फेस्टिव्हलमध्ये शिकायला मिळणार आहेत. तसेच या नाटकांचे प्रयोग पाहण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळांतील ५० विद्यार्थ्यांना दररोज विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.

Story img Loader