मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वारसा संवर्धन कक्षाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) सुमारे १२० वर्षे जुन्हा ‘सेठ सामलदास नरसीदास प्याऊ’चे संवर्धन केले असून, या प्याऊला जपानी पद्धतीच्या ‘कोई फिश पाँड’ची जोड देऊन त्याच्या सौंदर्यात भर घालण्यात आली आहे. संवर्धन केलेले प्याऊ राणीच्या बागेत पुनर्थापित करण्यात आले असून, त्यामुळे राणीच्या बागेला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ते आकर्षन बनले, असा विश्वास महानगरपालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिण्याच्या पाण्याची पाणपोई म्हणजे प्याऊ तत्कालीन मुंबई शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग होता. सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, बाजारपेठा, बंदरे, औद्योगिक क्षेत्र, उद्याने, ट्राम अथवा रेल्वे स्थानकांच्या बाहेर नागरिक आणि प्राणी, पक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून पाणपोई उभारण्यात आल्या होत्या. प्रसंगी आपल्या नातेवाईकांच्या, प्रियजनांच्या, स्नेहीजनांच्या स्मृतिप्रित्यर्थ या पाणपोई बांधण्यात आल्या. शहरात सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणा उभी राहिल्यानंतर या पाणपोई हळूहळू वापरातून बाद होवू लागल्या. दक्षिण व मध्य मुंबईत आता मोजक्याच प्याऊ शिल्लक आहेत. या पुरातन वारसाचे संवर्धन करून सांस्कृतिक ठेवा जपण्याचे प्रयत्न महानगरपालिकेच्या पुरातन वारसा संवर्धन कक्षामार्फत करण्यात येत आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार यासंदर्भातील विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे चार पुरातन प्याऊंचे संवर्धन करून ते राणीच्या बागेत पुनर्स्थापित करण्यात आले आहेत.

हेही वाचा – ‘या’ शहरात सुरु झाले पहिले ट्रान्सजेंडर सलून, जाणून घ्या काय आहे खासियत

मुंबईतील विविध ठिकाणच्या प्याऊंपैकी चार प्याऊ राणीच्या बागेत पुनर्स्थापित करण्याचा प्रकल्प पुरातन वारसा संवर्धन कक्षाने हाती घेतला होता. या चारही प्याऊंची निर्मिती साधारपणे १९०३ ते १९३३ या कालावधीमध्ये झाली आहे. वारसा स्तर ३ स्थापत्य प्रकारामध्ये या चारही प्याऊंची निर्मिती मोडते. सेठ सामलदास नरसीदास प्याऊ, अर्देशीर दादाभॉय दादीशेट प्याऊ (२), खिमजी मुलजी रंदेरिया प्याऊ असे हे एकूण चार प्याऊ आहेत. हे चारही प्याऊ राणीच्या बागेत अनेक वर्षांपासून सांभाळून ठेवले होते. त्यांचे जतन करण्याचे काम आता पूर्ण झाले आहे.

हेही वाचा – संजय राऊतांविरोधातील हक्कभंगाचं प्रकरण राज्यसभेच्या सभापतीकडे वर्ग; खासदारकी जाणार?

राणीच्या बागेत पुनर्स्थापित केलेल्या या चार प्याऊंपैकी ‘सेठ सामलदास नरसीदास प्याऊ’ सर्वाधिक आकर्षण ठरत आहे. सेठ सामलदास नरसीदास यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मातोश्री लवेरबाई नरसीदास यांनी १९०३ मध्ये ते बांधले होते. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या प्याऊच्या चारही बाजूला सिंहाच्या आकाराच्या मुखातून पाणी वाहण्याची सोय होती. कालांतराने वापरातून बाद झालेली ही प्याऊ मोडकळीस आली होती. त्यामुळे त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्याऊचे संवर्धन करताना त्याला एक दगडी कळस व भक्कम दगडी जोतं देण्यात आले, त्यामुळे त्यांचे कारंजामध्ये पुनश्च रुपांतर होवू शकले. राणीच्या बागेतील गोलाकार दगडी विहिरीसारखी संरचना असलेल्या पाणथळ जागेच्या मधोमध हे प्याऊ पुनर्स्थापित करून कारंजा बनवण्याचे ठरले. पर्यटकांच्या आकर्षणासाठी हे कारंजे जपानी पद्धतीचे ‘कोई फिश पाँड’ स्वरुपात तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.