काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्यावर शस्त्रास्त्र कायदा आणि वन्यजीव कायद्यांतर्गत नव्याने आरोप ठेवण्यास कनिष्ठ न्यायालयाने नकार दिल्यानंतर या निर्णयाचा फे रविचार करण्याची विनंती राजस्थान पोलिसांनी राजस्थान उच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र, सत्र न्यायालयाप्रमाणे उच्च न्यायालयानेही सलमानविरूध्द या दोन कायद्याअंतर्गत नव्याने आरोप ठेवण्यास नकार देत सलमानला दिलासा दिला आहे.
‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्यासह सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांच्यावर १९९८ साली शस्त्रास्त्र कायद्या अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. सत्र न्यायालयाने या कलाकारांविरुध्द शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत ठेवण्यात आलेले आरोप फेटाळून लावल्यानंतर २००६ साली पुन्हा राज्य सरकारने  विनंती अर्ज केला. यात सलमानवर वन्यजीव कायद्यानुसार बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी नव्याने आरोप दाखल करण्यात आले. मात्र, त्या कालावधीत सलमानकडे शस्त्रांस्त्राचा परवाना होता. त्यामुळे त्याच्यावर बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याचा आरोप ठेवला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने पोलिसांची विनंती फेटाळून लावली होती.
सलमानवर आधी वन्यजीव कायद्या अंतर्गत ठेवलेले आरोपच कायम ठेवून त्याप्रकरणी चार वर्ष प्रलंबित असलेली सुनावणी सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला दिले आहेत.