मुंबईतील एका पोलीस हवालदाराने आपल्या विधवा प्रेयसीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केली. बुधवारी सकाळी हाजी अली येथील सरकारी वसाहतीत ही खळबळजनक घटना घडली. विवाहबाह्यसंबंधांतून हे हत्याकांड घडले असावे असा पोलिसांचा संशय आहे.
सुधीर राणे (वय ४२) हा हवालदार न्यायाधीश सानप यांच्या संरक्षणासाठी तैनात होता. सरकारी वसाहतीमधील १४ क्रमांकांच्या इमारतीत राहणाऱ्या न्यायाधीश सानप यांच्या बंदोबस्तासाठी राणे तैनात होता.
बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास तेथून जवळच असलेल्या राजीव नगरमध्ये पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या शर्वरी खान (वय ४८) यांच्या घरी तो गेला. त्यांच्यावर आपल्या सव्‍‌र्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून त्याने तिची हत्या केली. त्यानंतर अध्र्या तासाने जवळच असलेल्या इमारत क्रमांक ११ मधील रेस्ट हाऊसमध्ये जाऊन स्वत:वरही गोळ्या झाडून त्याने आत्महत्या केल्याचे ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजेंद्र ठाकूर यांनी सांगितले.
राणे याने आत्महत्या केली तेव्हा इतर दोन पोलीस त्या खोलीत झोपलेले होते. राणे याने आत्महत्या केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
राणे माटुंगा पोलीस वसाहतीत राहात होता. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तो मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन ब्रँचमध्ये कार्यरत होता. गेली १२ वर्षे तो मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. या हत्येचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सुधीर आणि शर्वरी खान या दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध होते. त्यातूनच ही हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शर्वरी खान या विधवा असून त्यांना तीन मुले आहेत. त्यांच्या मोठय़ा मुलाचे लग्नही झाले आहे.
सुधीरच्या पत्नीला या विवाहबाह्य संबंधाबात माहिती मिळाली होती. त्यावरून तिने शर्वरीला जाबही विचारला होता. याच कारणामुळे राणे दांपत्यात तणाव निर्माण झाला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शर्वरी खान यांचा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय होता.

Story img Loader