लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ जागा काँग्रेस आणि भाजपसाठी महत्त्वाच्या असून, जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर दोन्ही पक्षांच्या आघाडय़ांचा भर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी कायम राहणार हे जवळपास स्पष्ट झाले असले तरी महायुतीमध्ये मनसे सामील होऊन तिचे विशाल युतीमध्ये रूपांतर होते की पडद्याआडून काही समझोता होतो याचीच राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. शिवसेना-भाजप आणि मनसे एकत्र येऊ नयेत म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते विविध क्लृप्त्या किंवा परस्परांमध्ये वाद लावून देण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न करत आहेत.
काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवण्याची घोषणा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. परिणामी नेहमीप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचा शेवटपर्यंत घोळ घातला जाणार नाही. आघाडीत गेल्या वेळेप्रमाणेच मतदारसंघांचे वाटप राहणार आहे. एखाद दुसऱ्या मतदारसंघांत अदलाबदल होण्याची शक्यता असली तरी २६-२२ हे वाटप कायम राहणार आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये २६-२२ हे जागावाटप अनेक वर्षे कायम आहे. यंदा रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष युतीत सामील झाल्याने वाटप बदलणार आहे. जागावाटप लवकर जाहीर करा, असा घोषा आठवले यांनी लावला असला तरी भाजप-शिवसेना युतीचे नेते जागावाटपाबाबत मौन बाळगून आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने युतीच्या मतांवर डल्ला मारल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा झाला. यामुळेच मनसेने युतीबरोबर यावे, असा भाजपचा प्रयत्न आहे. मनसे युतीबरोबर गेल्यास आघाडीसाठी मोठे आव्हान राहील. राज ठाकरे यांनी मात्र आपले पत्ते उघड करण्याचे टाळले आहे. यातूनच मनसे कोणती भूमिका घेते यावरच पुढील राजकीय गणिते अवलंबून आहेत.
उत्तर प्रदेशनंतर लोकसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व असल्याने साहजिकच राज्यातील राजकीय घडामोडींवर सर्वच राजकीय पक्षांचे बारीक लक्ष आहे. पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी स्वत: दौरा करून राजकीय आढावा घेतला आहे. मोदी यांनी गेल्याच आठवडय़ात राज्यातील भाजपच्या नेत्यांबरोबर चर्चा करून राजकीय परिस्थिती कशी असेल हे जाणून घेतले. मनसे बरोबर आल्यास किंवा वेगळा लढल्यास काय चित्र राहील याचाही आढावा भाजपच्या बैठकीत घेण्यात आला. शरद पवार यांनी जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याच्या उद्देशाने लक्ष घातले आहे.गेल्या वेळ ऐवढे शक्य झाले नाही तरी १२ ते १५ खासदार राज्यातून निवडून आणण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या माध्यमातून छोटय़ा पक्षांची मोट बांधली आहे.
गेल्या वेळचे चित्र असे होते.
गेल्या वेळी राज्यातील ४८ पैकी सर्वाधिक १७ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. शिवसेना (११), भाजप (९), राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून आले होते. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी, हातकणंगलेत शेतकरी नेते राजू शेट्टी तर कोल्हापूरमध्ये अपक्ष सदाशिव मंडलिक हे विजयी झाले होते.
खासदारांचा सात-बारा
लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याने गेल्या पाच वर्षांमध्ये खासदारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये विकासाची कोणती कामे केली, किती संपर्क ठेवला, किती निधी खर्च केला, मतदारांना काय वाटते, विरोधकांचे म्हणणे काय, याचा लेखाजोखा ‘खासदारांचा सात-बारा’ या सदराच्या माध्यमातून उद्यापासून दर रविवारी मांडला जाणार आहे.
निवडणुका जवळ आल्याने पाच वर्षांमध्ये खासदारांनी विकासाची कोणती कामे केली, किती निधी खर्च केला, मतदारांना काय वाटते, विरोधकांचे म्हणणे काय, याचा लेखाजोखा ‘खासदारांचा सात-बारा’ या सदराच्या माध्यमातून उद्यापासून दर रविवारी मांडला जाणार आहे.