मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वपक्षीय उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी, प्रचार फेऱ्या, पदयात्रा, रोड शो, चौकसभा, जाहीर सभा, मेळावे घेत मतदारसंघ पिंजून काढण्यावर भर दिला. पक्षाचा जाहीरनामा आणि ध्येयधोरणे सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्यावर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी जोर दिला. गेल्या महिनाभर धडाडत असलेल्या प्रचाराचा तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्यानंतर रविवारचा दिवस उमेदवारांसाठी काहीसा विश्रांतीचा होता. मतदानाचा टक्का कसा वाढवता येईल आणि मतदानाच्या दिवशी कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतील, याबाबत कार्यकर्त्यांच्या बैठकही घेण्यात आल्या.
मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगत आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांसमोर भिडत आहेत. दक्षिण मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी रविवारी शिवसेनेच्या शाखांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मतदान प्रतिनिधी (पोलिंग एजंट) नेमलेत की नाही, याबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली. तसेच मतदारांना मतदान करताना काही अडचणी येणार नाहीत याची सावंत यांनी खात्री केली. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांनीही विशेष बैठका घेत कार्यकर्त्यांशी चर्चा केली व मतदान केंद्राबाबत मतदारांना काही अडचणी आहेत का, याकडे त्यांनी लक्ष दिले.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी कार्यकर्त्यांसोबत विशेष बैठक घेत चर्चा केली. तसेच प्रत्यक्ष मतदानादिवशी नियोजन व जबाबदारी कशी असेल, याबाबत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दोन महिने कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन प्रचार केल्यानंतर जास्तीत जास्त नागरिक मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क कसा बजावतील आणि मतदानाची टक्केवारी कशी वाढेल, याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई हेसुद्धा संपूर्ण दिवस कामात व्यस्त होते. पक्षांतर्गत बैठका, कार्यकर्त्यांशी संपर्क, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाच्या तयारीची पाहणी आदी कामांमध्ये त्यांचा संपूर्ण दिवस गेला. मतदानाच्या दिवसाचे नियोजन करण्यात देसाई व्यस्त होते. तसेच, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. या मतदारसंघासाठी दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार बदलले असून काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि भाजपकडून ॲड. उज्वल निकम निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
रविवारी गायकवाड यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच दुपारच्या दरम्यान कार्यालयात असणाऱ्या कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. तर ॲड. निकम यांनी दुपारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि सायंकाळी कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासह कार्यालयात येणाऱ्या – जाणाऱ्यांची भेट घेतली. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी सकाळी कार्यालयाला भेट दिली. तेव्हा बहुसंख्य नागरिकांनी वायकरांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. त्यावेळी नागरिकांच्या समस्या ऐकून वायकरांनी त्यांना मार्गदर्शन केले. तसेच, त्यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. याच मतदासंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी दिवसभर कार्यकर्त्यांच्या बैठका, व्यक्तीगत भेटीगाठी घेतल्या. लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तसेच त्यांनी मतदानाच्या दिवशीच्या कामाचा आढावा घेतला.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे निवडणुकीच्या रिंगणात उभे असून प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर त्यांनी शनिवारी सायंकाळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत वडापावचा आस्वाद घेतला. तर रविवारी सकाळी कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर परिसरातील मिसळ पाववर ताव मारला. त्यानंतर त्यांनी कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. तर काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांनी प्रचाराच्या धावपळीतून वेळ मिळाल्यानंतर व्यायामशाळेत जाऊन व्यायाम केला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. मतदारसंघातील नागरिकांचे व हितचिंतकांचे येणारे दूरध्वनी घेऊन त्यांच्यासोबतही पाटील यांनी संवाद साधला.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी भाजप, शिवसेना, मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि निवडणुकीच्या दिवशी विरोधी पक्षाकडून कोणताही गैरप्रकार होणार नाही, याकडे विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच विरोधकांनी काही गडबड करू नये, म्हणून कार्यकर्त्यांना वस्त्यावस्त्यांमध्ये लक्ष ठेवण्यासही सांगितले. मुलुंड ते घाटकोपर, मानखुर्द परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करत त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच विधानसभानिहाय कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय पाटील यांनी रविवारी दिवसभर कार्यकर्त्यांशी संवाद साधत संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला. मतदारसंघात कुठेही गडबड होणार नाही, याबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच मुलुंड ते घाटकोपर आणि मानखुर्द – शिवाजी नगर परिसरातील शाखांमधील गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख यांच्यासोबत बैठका घेऊन मतदारसंघाची एकूण परिस्थिती त्यांनी जाणून घेतली व पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. तसेच विरोधी पक्षाकडून मानखुर्द शिवाजी नगर परिसरात गडबड होण्याची शक्यता असल्याने तेथील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.