राज्यातील टोलवसुली विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छेडलेल्या आंदोलनाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून झालेले नुकसान आंदोलकांकडून वसूल केले जाईल, तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची तपासणी सुरू असून त्यात काही आक्षेपार्ह आढळले तर त्यांच्यावरही कारवाई करू, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी दिली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाशीत दिलेल्या आदेशानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून राज्यात टोलफोड आंदोलन सुरू केले आहे. या पाश्र्वभूमीवर गृहमंत्री पाटील यांनी विधानभवनात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी मनसेच्या आंदोलनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे काही अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. त्यावर सर्वच टोल नाक्यांवर बंदोवस्त वाढवा, आंदोलकांची गय करू नका, आणि झालेले नुकसान त्यांच्याकडून वसूल करा, असे आदेश पाटील यांनी दिल्याचे समजते. राज ठाकरे यांच्या भाषणाची सध्या तपासणी सुरू असून कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, तसेच आंदोलकांकडून झालेले नुकसान वसूल केले जाईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Story img Loader