मुंबई : प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी स्थानकांमध्ये सरकते जिने उभारण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, सरकते जिने उभारताना जास्त जागा व्यापली जात असून त्यामुळे फलाटावरील रुंदी कमी होऊन प्रवाशांना रहदारी करणे अडचणीचे होत आहे. तसेच रेल्वे स्थानकांवर बसविण्यात आलेले सरकते जिने दोन्ही बाजूने १ ते १.५ मीटर अंतर सोडून बंदिस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे मोकळी जागा राहत आहे. त्यामुळे बंदिस्त केलेल्या जागेचे अंतर कमी करून सरकत्या जिन्याची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना फलाटावरून ये-जा करणे सोयीस्कर होणार आहे.

मुंबई महानगरातील रेल्वे स्थानकांतील इंच न इंच जागेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे दररोजच्या रहदारीच्या ठिकाणी थोडा बदल केला, तर त्याच्या चांगला किंवा वाईट परिणामाला सामोरे जावे लागते. फलाटावरील सरकत्या जिन्यांनीच जास्त जागा अडवल्याने, फलाटावरून प्रवाशांना प्रवास करणे गैरसोयीचे होते. तसेच अनेक वेळा सरकत्या जिन्यावरून जाण्यासाठी प्रवाशांच्या लांब रांगा लागतात. त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची भीती आहे. यासह बंदिस्त पत्र्याने झाकलेल्या जागेत कचरा साचून उंदीर, डासांचे प्रमाण वाढते. या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांना जाता येत नाही. त्यामुळे घाणीच्या साम्राज्यामुळे दुर्गंधी पसरते. परिणामी, सरकत्या जिन्यांची उभारणी नव्या संरचनेप्रमाणे करण्यात येत आहे, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – “बाईची नग्न धिंड काढली देश शांत, गाईची धिंड काढली असती, तर…”; मनुस्मृतीचा उल्लेख करत आव्हाडांचा हल्लाबोल

सरकते जिने प्रवाशांच्या सोयीसाठी आहेत. सरकत्या जिन्याच्या दोन्ही बाजूस १ ते १.५ मीटर अधिक जागा सोडून बंदिस्त पत्र्यांनी जागा व्यापली आहे. येथे कचऱ्याची समस्या वाढली आहे. त्यामुळे कमी जागा व्यापणारे सरकते जिने उभारण्यात येत आहेत. – रजनीश गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, मध्य रेल्वे

हेही वाचा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णांना मिळणार जेनेरिक औषधे, राज्यातील १८ रुग्णालयांमध्ये सुरू होणार केंद्रे

मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत १६६ सरकते जिने आहेत. तर, मार्च २०२४ पर्यंत मध्य रेल्वेत आणखीन ६६ सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. मुंबई विभागात मार्च २०२४ पर्यंत ५४ नवीन सरकते जिने बसवण्यात येणार आहेत.


Story img Loader