मुंबई : मुंबई महानगरपालिकेने वांद्रे येथील खेरवाडी परिसरातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. संत मुक्ताई मार्गाचे काँक्रीटीकरण झाले असून लगतच्या पदपथाचे कामी हाती घेण्यात आले आहे. पदपथाच्या बांधकामासाठी संबंधित भागात लोखंडी सळ्यांचा सांगाडा उभारण्यात आला आहेत. गेल्या महिनाभरापासून हे काम बंद असल्याने सुमारे दोन ते अडीच फूट खोल खड्डयातील लोखंडी सळई उघड्या पडल्या आहेत. परिणामी, अपघात घडण्याची शक्यता आहे. पदपथाच्या बांधकामाला लगतच्या दुकानदारांकडून विरोध होत असल्यामुळे कंत्राटदाराने काम थांबवल्याचे समजते.
महानगरपालिका प्रशासनाने खड्डेमुक्त मुंबईचा संकल्प सोडला असून मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांना वेग दिला आहे. दरम्यान, पालिकेने वांद्रे पूर्व परिसरातील मोठ्या संख्येने रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. त्या भागातील संत मुक्ताई मार्गाचे काँक्रीटीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गावरील पदपथाखाली पर्जन्य जलवाहिनी आहे. ही पर्जन्य जलवाहिनी वळवण्याची मागणी स्थानिक दुकानदारांनी केली आहे. मात्र, ते काम शक्य नसल्याने पदपथाच्या बांधकामाचा पेच निर्माण झाला आहे. स्थानिकांकडून होणाऱ्या विरोधामुळे कंत्राटदाराने पदपथाचे काम थांबवले आहे. मात्र, यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पदपथाच्या बांधकामासाठी त्यालगत लोखंडी सळ्यांचा सांगाडा उभारण्यात आला आहे.
आता केवळ स्लॅब टाकायचे काम शिल्लक आहे. मात्र, गेल्या महिनाभर पदपथाच्या बांधकामासाठी उभारलेल्या लोखंडी सळ्या उघड्या आहेत. काही दिवसांपूर्वी रात्री त्या खड्ड्यात एक श्वान पडले होते. मात्र, नागरिकांनी तात्काळ त्याला बाहेर काढले. तसेच, एक अंध व्यक्तीही या खड्ड्यात पडणार होती. यासंदर्भात केलेल्या तक्रारींना महापालिकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.