मुंबई : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या दादर थांब्यावर हिरकणी कक्ष सुरू करण्यात आले. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. महिलांसाठी हिरकणी कक्ष ही अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे. त्यामुळे आता दादरपाठोपाठ परळ आणि कुर्ला या दोन आगारांमध्येही हिरकणी कक्ष सुरू करण्यात येणार आहे.
स्तनदा मातांना त्यांच्या बालकांना स्तनपान करण्यासाठी आवश्यक व सुरक्षित जागा उपलब्ध करण्याच्या हेतूने दादर टीटी येथील एसटीच्या थांब्यावर हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. लहान बाळासह प्रवास करणाऱ्या महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाने हिरकणी कक्ष स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या कक्षाचे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार, एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक मोनिका वानखेडे, यंत्र अभियंता गुलाब बच्छाव आणि आगार व्यवस्थापक नितीन चव्हाण आदी उपस्थित होते.
हेही वाचा – मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
ॲड. सुशीबेन शहा म्हणाल्या की, महिलांसाठी हिरकणी कक्ष ही गरजेची आणि उत्तम सुविधा आहे. हे कक्ष प्रत्येक आगारात असायला हवेत. त्यामुळे लवकरच कुर्ला आणि परळ या दोन्ही आगारांमध्येही अशा प्रकारचे कक्ष उभारले जातील. तसेच सध्या एसटी महामंडळाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत देऊ केली आहे. ही वयोमर्यादा ७५ ऐवजी ६५ करण्यात यावी, यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करेन, असे त्या म्हणाल्या.