मुंबई: गोराई गावातील पाणी पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी पालिकेच्या जलअभियंता विभागाने सध्याच्या जल वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याचे काम घेण्यात आले आहे. गोराई क्रॉस येथे शोषण टाकी बांधून पुढे हे पाणी गोराई गावात वितरित केले जाणार आहे. त्यासाठी २५० ते ३०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र एस्सेल वर्ल्ड परिसरात जलवाहिन्या टाकण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यामुळे रहिवाशांनी सहकार्य करावे यासाठी पालिका प्रशासनाने परिसरातील लोकप्रतिनिधींना विनंती केली आहे.
पश्चिम उपनगरात बोरिवली येथे खाडीच्या पलिकडे असलेल्या गोराई परिसरात गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रचंड पाणी टंचाई आहे. मुंबईत पाणी पुरवठा करणारी धरणे पूर्ण भरली असली तरी तेथील गावांमध्ये वर्षाचे बारा महिने पाणी टंचाई असते. गोराई गावांतील रहिवाशांनी आतापर्यंत पाण्यासाठी अनेक आंदोलने केली. मात्र पाणी पुरवठ्याची समस्या काही कमी होऊ शकली नाही. मात्र आता पालिका प्रशासनाने या विभागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेतला आहे.
हेही वाचा >>>वृद्धापकाळातील आरोग्य सेवा गतिमान करणार! वर्षभरात साडेदहा लाख वृद्धांवर उपचार…
गोराई गावात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी सध्याच्या जलवाहिन्या बदलून ३०० मिलिमीटर व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तेथील टेकडीवरील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेचे उत्तन रोड येथे शोषण टाकी व उदंचन केंद्र बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या कामासाठी साडे नऊ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी चालू अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली होती. त्यानुसार सध्या हे काम सुरू आहे. या परिसरात पाण्याची भूमिगत टाकी बांधण्यात येणार असून त्यात पाणी साठवून मग ते मोटर पंपच्या सहाय्याने उंचावरील गावांना वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे उत्तन भागातील टेकडीवरील गावांना तसेच एस्सेल वर्ल्डकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील गावांना पाणी पुरवठा होऊ शकणार आहे.
हेही वाचा >>>कांजुरमार्ग येथली हत्येप्रकरणी दोघांना अटक; कांजूर मेट्रो कारशेड परिसरात सापडला होता मृतदेह
या परिसरात रोड्रीक फार्म ते गोराई चर्च दरम्यान ३०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी व उदंचन केंद्रांच्या पुढे एस्सेल वर्ल्ड वाहनतळापर्यंत २५० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकरण्यात येणार आहे. त्यापैकी गोराई चर्चपासून जुईपाड्यापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पुढील कामाला येथील रहिवाशांनी विरोध केला आहे. त्यामुळे या प्रकरणी पालिका प्रशासनाने आमदार संजय उपाध्याय यांना पत्र लिहून रहिवाशांचा विरोध मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.
पॅगोडा परिसरातही नवीन जलवाहिन्या
जलवाहिन्यांच्या व्यवस्थेची सुधारणा करण्याची कामे पूर्ण झाल्याने गोराई गावाला योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याची खातरजमा केल्यानंतर ग्लोबल विपश्यना पॅगोडा येथे नवीन जलजोडणीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.