मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘कल्याण – डोंबिवली – तळोजा मेट्रो १२’च्या बांधकामासाठी मागविलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कामासाठी तीन नामांकित कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करून मार्चअखेरीस ‘मेट्रो १२’च्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार आहे.
एमएमआरडीएच्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘मेट्रो १२’ प्रकल्प. २०.७५ किमी लांबीची कल्याण – तळोजा अशी ही मार्गिका असून या मार्गिकेवर १९ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली एमआयडीसी, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोलोगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा या मेट्रो स्थानकांचा यात समावेश आहे. ही मेट्रो मार्गिका ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेची विस्तारीत मार्गिका आहे. त्यामुळे ‘मेट्रो १२’ मार्गिकेमुळे ठाणे आणि नवी मुंबई ही महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहे.
हेही वाचा >>>मुंबई : मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला नकार देणाऱ्या कुटुंबांचे समुपदेशन
या मार्गिकेच्या कामासाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत. त्यानुसार तांत्रिक निविदेत तीन कंपन्यांना पात्र ठरल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली. गवार कन्ट्रक्शन लिमिटेड, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड आणि वेल्सपून इन्टरप्रायझेस लिमिटेड या तीन कंपन्यांचा त्यात समावेश आहे. आता या तीन कंपन्यांकडून आठवड्याभरात आर्थिक निविदा मागविण्यात येणार आहेत. आर्थिक निविदांच्या छाननीअंती पात्र कंत्राटदाराला कंत्राट देण्यात येणार आहे. दरम्यान, निविदा प्रक्रिया अंतिम करून मार्चअखेरीस मेट्रो १२ च्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा मानस असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.