मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सातत्याने भूमिका बदलते, अशी काहींनी टीका केली. मात्र आम्ही भूमिका बदलली नसून मुद्द्यांवर बोलत आहोत. काविळ झालेल्यांना सारे जग पिवळे दिसते, असे प्रत्युत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी टीकाकारांना दिले. राम मंदिराचा मुद्दा कित्येक शतके प्रलंबित होता. मोदी नसते तर राम मंदिर झाले नसते, असे स्पष्ट करत मोदींना दिलेल्या पाठिंब्याचे समर्थन केले.
मनसेचा शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा झाला. त्यामध्ये राज यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी यांना पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली होती. महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी मनसेची आज बैठक झाली. आमच्या कोणत्या नेत्यांशी संपर्क साधायचा याची यादी काही दिवसांमध्ये दिली जाईल, प्रचाराच्या सभा घेण्यासंदर्भात पुढे बघू, असे राज म्हणाले.
हेही वाचा >>>किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका; “दात पडलेला, नखं काढलेला, शक्तीहीन वाघ लोकांना..”
उद्धव यांना टोला
राज म्हणाले की, मेळाव्यामध्ये मोदींना का पाठिंबा देत आहे, याबाबत बोललो आहे. पहिल्या पाच वर्षांमध्ये मोदी यांच्या काही भूमिका पटल्या नव्हत्या. त्यामुळे टीका केली होती. मात्र, ती मुद्द्यांवरती टीका होती. मला मुख्यमंत्रीपद हवे म्हणून टीका केली नव्हती. माझे ४० आमदार फोडले म्हणून टीका केली नव्हती, असे सांगत राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागली.
पाच वर्षांमध्ये देशात जे बदल झाले आहेत, त्याचे मी स्वागत केले आहे. यामध्ये राम मंदिर, अनुच्छेद ३७० रद्द करणे असे चांगले निर्णय मोदींनी घेतले आहेत. राम मंदिर उभे राहिल्याने बळी गेलेल्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील, असे त्यांनी नमूद केले.
विकासाचे मुद्दे प्रलंबित
विकासाचे अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. मात्र तेसुद्धा मोदी पूर्ण करतील. तरुणांना रोजगार, मराठी भाषेला अभिजात दर्जा असे विषय मोदी मार्गी लावतील, अशी आशा आहे. मोदी गुजरातचे आहेत, त्यांचे गुजरात प्रेम स्वाभाविक आहे. मात्र, सर्वच राज्यांना मोदींनी आपल्या मुलांप्रमाणे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली.