कुठलाही आजार अमुक कारणाने होत नाही. तर त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणामुळे आजार झाला आहे हे माहीत नसेल वा स्पष्ट नसेल तर विमाधारक योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतो.
[jwplayer 5wCSijMb]
मद्यपान, धूम्रपान वा तंबाखूचे सेवन यामुळे होणाऱ्या रोगांना विमाकवच दिले जाऊ शकत नाही, असे सांगत बऱ्याच कंपन्या ग्राहकांचे दावे फेटाळून लावतात अथवा हीच बाब हेरून ते फेटाळण्याकडे त्यांचा कल असतो, परंतु आजाराचे कारण काही वेगळे असेल तर मद्यपान, धूम्रपान वा तंबाखूचे सेवन यामुळेच रोग झाला हे ठामपणे सांगता येत नाही. तसेच त्याआधारे विम्याचा दावा फेटाळणे योग्य होणार नाही, असा निर्वाळा देत ग्राहक मंचाने ग्राहकाला दिलासा दिला आहे.
दिनेश जयंतीभाई मेहता यांनी ओरिएंटल विमा कंपनीकडून वैद्यकीय विमा योजना घेतली होती. ते, त्यांची पत्नी आणि दोन मुले यांना या विमा योजनेचे संरक्षण मिळणार होते. २००० साली त्यांनी ही योजना घेतली. प्रत्येक वर्षी ते तिचे नूतनीकरण करत. होते. योजनेच्या मुदतीदरम्यान म्हणजेच ३ जानेवारी २०११ ते २ जानेवारी २०१२ या कालावधीत मेहता आजारी पडले आणि त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रिन्स अली खान रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना जबडय़ाचा कर्करोग झाल्याचे निदान केले. तातडीने त्यांच्यावरील उपचाराला सुरुवात झाली. त्यासाठी २ लाख ९१ हजार ८३८ रुपये एवढा उपचार खर्च आला.
वैद्यकीय विमा काढल्याने मेहता यांनी ‘रक्षा’ या मध्यस्थ कंपनीच्या माध्यमातून विम्यासाठी दावा केला. परंतु तंबाखू सेवनामुळे त्यांना कर्करोग झाला असून त्यांना वैद्यकीय विमा मंजूर केला जाऊ शकत नाही, असे कारण पुढे करत कंपनीने त्यांचा दावा फेटाळून लावला. त्यामुळे मेहता यांनी मध्यस्थ कंपनीकडे असलेली त्यांची वैद्यकीय कागदपत्रे परत मागवली. ती कागदपत्रे घेऊन ते त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे गेले. त्यांना कर्करोग नेमका कशामुळे झाला, त्यामागे नेमकी कारणे कोणती होती, मद्यपान, धूम्रपान व तंबाखू सेवनानेच तो होतो का, याबाबत त्यांचे मत घेतले. त्यावर तंबाखू सेवनाव्यतिरिक्त अन्य कारणांमुळेही कर्करोग होऊ शकतो, असे डॉक्टरांनी मेहता यांना सांगितले. शिवाय आपल्या तज्ज्ञ मताचे प्रमाणपत्रही त्यांना दिले.
हे प्रमाणपत्र सादर करत मेहता यांनी पुन्हा एकदा विम्याच्या दाव्यासाठी अर्ज केला व त्यांच्या दाव्याचा फेरविचार करण्याची विनंती कंपनीला केली. मात्र आधीच्या कारणांचाच हवाला देत कंपनीने पुन्हा एकदा मेहता यांचा दावा फेटाळून लावला. कंपनीच्या या अडेल भूमिकेनंतर मेहता यांनी अखेर ग्राहक मंचाकडे धाव घेत कंपनीविरोधात सेवेत कुचराई तसेच अनुचित व्यापार व्यवहारप्रकरणी (अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस) तक्रार दाखल केली. शिवाय १५ टक्के व्याजासह अडीच लाख रुपयांच्या विम्याची रक्कम देण्याचे आदेश कंपनीला द्यावेत, अशी मागणी केली. याव्यतिरिक्त ५० हजार रुपये नुकसानभरपाई आणि कायदेशीर लढाईचे २५ हजार रुपये देण्याचीही मागणी केली.
मेहता यांचा दावा फेटाळण्याचा निर्णय योग्य होता, असे सांगत मेहता यांच्या वैद्यकीय कागदपत्रांचाच दाखला कंपनीने न्यायालयात आपली बाजू मांडताना दिला. या कागदपत्रांमध्ये मेहता यांना जबडय़ाचा कर्करोग झाला असून ते गेले १५ ते २० वर्षे तंबाखूचे सेवन करत होते, असे म्हटले होते. शिवाय तंबाखू सेवन करत असल्याची बाब मेहता यांनी विमा योजना घेताना अर्जात नमूद केली नव्हती, असा दावाही कंपनीतर्फे करण्यात आला. कर्करोग हा धूम्रपान व तंबाखूचे सेवन केल्याने होतो व या कारणामुळे झालेल्या आजाराला कंपनीच्या अटींनुसार विम्याचे संरक्षण मिळू शकत नाही किंवा विमाधारक त्यासाठी दावा करू शकत नाही, अशी भूमिका कंपनीने न्यायालयात घेतली.
मद्यपान, धूम्रपान वा तंबाखूचे सेवन आदींमुळे होणाऱ्या आजारांना कंपनीने आपल्या विमा योजनेतून वगळले आहे. परंतु मेहता यांना यापैकी कुठल्याही कारणास्तव कर्करोग झाल्याचा पुरावा नाही. उलट त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने तंबाखू सेवनाबरोबरच अन्य कारणेही कर्करोगास कारणीभूत असल्याचे मत प्रतिज्ञापत्राद्वारे दिले आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ मेहता यांच्या वकिलांनाही बरीच माहिती पुराव्यादाखल सादर केली. या सगळ्या बाबी लक्षात घेत जबडय़ाच्या वा तोंडाच्या कर्करोगासाठी अनेक घटक कारणीभूत असतात.
मद्यपान, मुखविकार, जेवण आणि जीवनसत्त्वांतील कमतरता, विषाणू, सूर्यप्रकाश, आनुवंशिकता, वाढीचा वेग अशा कारणांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे तो केवळ तंबाखू सेवनामुळे होतो असे म्हणणे चुकीचे ठरेल, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मताकडे दुर्लक्ष करून कंपनीने चुकीच्या कारणासाठी मेहता यांचा दावा फेटाळण्याचा निर्वाळा दिला. त्याचप्रमाणे कंपनीला नऊ टक्के व्याजाने अडीच लाख रुपयांची विम्याची रक्कम मेहता यांना देण्याचे आदेश दिले. शिवाय १० हजार रुपये नुकसान भरपाईसह कायदेशीर खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्याचेही आदेश दिले.
वैद्यकीय तज्ज्ञांचे मत महत्त्वाचे
वैद्यकीय विम्याच्या प्रकरणांमध्ये तज्ज्ञांचे मत खूप महत्त्वाचा आणि भक्कम पुरावा मानला जातो. आपली तक्रार आणि दावा किती योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी ते गरजेचे आहे. त्यासाठी उपचाराची कागदपत्रे ताब्यात घेऊन उपचार करणारे डॉक्टर वा मान्यताप्राप्त तज्ज्ञांकडून आजाराच्या नेमक्या कारणांची मीमांसा करणारे तसेच काय उपचार केले याचा तपशील उघड करणारे प्रमाणपत्र घ्यायला हवे. हे प्रमाणपत्र पुराव्यादाखल तक्रारीसोबत सादर केल्यास तक्रारीला वजन येते. अर्धा दावा तिथेच जिंकल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
खबरदारीही गरजेची
विमाधारकाने एखादी वैद्यकीय चाचणी केली असेल आणि त्यात काही रोगनिदान झाले असेल तर ते त्याने संबंधित कंपनीला कळवायला हवे, परंतु ही बाब माहीत नसल्यानेच विमा कंपन्यांकडून त्याचा फायदा उठवला जातो वा त्याचा आधार घेत अमुक आजाराचा योजनेत समावेश नाही, असे सांगत दावा फेटाळला जातो.
[jwplayer k4dUpC7B]