मुंबई : आरोग्यास पूरक आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी अमिनो ॲसिड वापरल्याबद्दल ग्राहक आयोगाने एका कंपनीला निकृष्ट सेवा दिल्याप्रकरणी दोषी ठरवले. तसेच, अशा उत्पादनांमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम नाकारता येणार नाहीत, असे नमूद करून या सगळ्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा उत्पादनांचा वापर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग्य नसल्याचेही आयोगाने कंपनीला निकृष्ट सेवा दिल्याप्रकरणी दोषी ठरवताना नमूद केले. तसेच तक्रारदाराने खरेदी केलेल्या उत्पादनाची किंमत आणि प्रयोगशाळेच्या चाचणीच्या खर्चापोटी ३६ हजार ४०९ रुपये भरपाई देण्याचे आदेश बिगमसल्स न्यूट्रिशन या कंपनीला दिले.

हेही वाचा…मुंबई : पोलीस ठाण्यातील शौचालयाची जाळी तोडून चोर पसार

अशा प्रथिने भुकटीचे सेवन केल्याने डोकेदुखी, पुरळ, गोळा येणे, मळमळ आणि अतिसार यांसारखे अल्पकालीन दुष्परिणाम होऊ शकतात हे उत्पादनांच्या चाचणीत आढळले आहे. याशिवाय अमिनो-स्पाइक्ड व्हे प्रोटीनचे दीर्घकाळ सेवन केल्याने काही दीर्घकालीन दुष्परिणामही होऊ शकतात. हृदय आणि यकृताशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात, असे आयोगाने तक्रारदाराची तक्रार योग्य ठरवताना म्हटले आहे.

निकृष्ट दर्जाच्या आरोग्यपूरक आहार उत्पादनांच्या सेवनामुळे देशात अनेकांचा मृत्यू झाल्याचे नुकतेच उघड झाले आहे. परिणामी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने देशातील अशा उत्पादन कंपन्यांच्या अनुचित व्यापार पद्धतींचा निषेध केल्याचेही आयोगाने आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा…‘मेट्रो ३’चे २४ जुलै रोजी लोकार्पण होणार असल्याचे विनोद तावडे यांच्याकडून ट्वीट, नंतर ट्वीट हटवले

या संदर्भात तक्रारदाराने कोणतेही अहवाल, पुरावे किंवा दस्तऐवज सादर केलेले नसले तरी, प्रयोगशाळेतील चाचणीत उत्पादनामध्ये आढळून आलेली सामग्रीमधील असमानता निश्चितपणे चिंतेचे कारण आहे. तसेच, अशा उत्पादनांच्या सेवनामुळे प्रतिकूल परिणाम नाकारता येत नाही. अमिनो ॲसिडच्या मदतीने प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे आणि तो स्वीकारला जाऊ शकत नाही, असेही आयोगाने आदेशात म्हटले आहे. मापन केलेल्या प्रथिनांची पातळी वाढवण्यासाठी नायट्रोजन-समृद्ध घटक जोडणे याला सामान्यतः प्रोटीन-स्पाइकिंग, नायट्रोजन-स्पाइकिंग किंवा अमिनो-स्पाइकिंग असे म्हणतात.

दरम्यान, तक्रारदार हा आरोग्याविषयी खूप जागरूक आहे. त्याने ई-कॉमर्सवरून बिगमसल्स न्यूट्रिशनचे व्हे प्रोटीन १५९९ रुपयांना खरेदी केले होते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, कंपनीने दिलेल्या उत्पादनाच्या जाहिरातीमध्ये शंभर टक्के परफॉर्मन्स व्हे प्रोटीन पावडरमध्ये साखर न घालता २४ ग्रॅम उच्च दर्जाचे प्रथिन असल्याचा दावा करण्यात आला होता. तथापि, कंपनीने केलेल्या दाव्यांनंतर आणि कंपनीच्या उत्पादनाबाबत झालेली टीका लक्षात घेऊन तक्रारदाराने कंपनीच्या उत्पादनाची पोषण चाचणी आणि अमिनो नोंद चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या चाचणीचा अहवाल तक्रारदाराने तक्रारीसह जोडला होता.

हेही वाचा…एअरपोर्ट फनेलवासीयांच्या पुनर्विकासासाठी अखेर टीडीआर!

प्रयोगशाळेच्या अहवालाचे अवलोकन केल्यावर आयोगाने, प्रथिने सामग्री वाढवण्यासाठी प्रथिने पावडरमध्ये केवळ अमिनो ॲसिडच नाही तर साखर आणि कर्बोदकांमध्ये देखील जास्त प्रमाणात वापरण्यात आल्याचे नमूद केले. तसेच, प्रयोगशाळेचा हा अहवाल कंपनीच्या दाव्याच्या परस्परविरोधात असल्याची टिप्पणी केली. ग्राहकांच्या आयोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी उत्पादने, त्यातील सामाग्रीबाबत खोटे दावे करणे, हे निश्चितपणे निकृष्ट सेवा देण्यासारखे आहे, असे आयोगाने स्पष्ट केले.

हेही वाचा…६६ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुण्यातून अटक

प्रथिने-स्पाइकिंग हे ग्राहकांची दिशाभूल करणारे आहे हे माहीत असूनही, कंपनीतर्फे या उत्पादनाची जाहिरात करणे, वितरण करणे, उत्पादन करणे, विपणन करणे आणि भ्रामक आणि फसव्या पद्धतीने उत्पादनाची विक्री करणे सुरूच ठेवते, जे अनुचित व्यापार प्रथा आहे, असेही आयोगाने कंपनीला निकृष्ट सेवेप्रकरणी दोषी ठरवताना नमूद केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consumer commission finds one company guilty of poor service over protein spiking in health supplements mumbai print news psg
Show comments