लगीनघाईत नात्याची वीण उसवू नये, या काळजीत वधूपक्ष असतोच पण लग्नाच्या सूटची शिलाई उसवू नये, ही काळजी वरपक्षाच्याही माथी आली. त्यातून सूट शिवणाऱ्या शिंप्याविरुद्ध ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल झाली आणि मंचानेही निष्काळजीपणाचा ठपका ठेवत सूट बिघडविणाऱ्या शिंप्याला सूटच्या खर्चासह चार हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देऊन चांगलाच दणका दिला.
नवी मुंबई येथील विष्णू पवार यांनी सप्टेंबर २००८ मध्ये चेंबूर येथील ‘आनंद प्रीमियम कलेक्शन’ या दुकानातून मुलाच्या लग्नाच्या ‘थ्री पीस सूट’साठी कापड विकत घेतले. सूट वेळेत शिवून मिळावा म्हणून त्यांनी दुकानदाराकडेच सूट शिवण्याचेही काम सोपवले. परंतु सूट जेव्हा हातात पडला त्या वेळी त्याची शिलाई योग्यप्रकारे केलेली नसल्याचे पवार यांना आढळून आले. तसेच शिंप्याने चुकीच्या पद्धतीने तो शिवल्याचेही त्यांच्या लक्षात आले. दुकानदाराला ही बाब सांगूनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने पवार यांनी अखेर एप्रिल २०१० मध्ये ग्राहक मंचाकडे धाव घेतली. सूटच्या खर्चासह नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली होती.
पवार यांच्या तक्रारीवर सुनावणी घेताना मंचाने दुकानदाराला आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली. परंतु त्यांच्याकडून नोटिशीवर काहीच उत्तर दाखल न करण्यात आल्याने मंचाने अखेर पवार यांचा दावा मान्य करीत शिंप्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला. पवार यांनी सूटचे कापड खरेदी करण्यासह शिवणकामासाठी नऊ हजारांहून अधिक पैसे खर्च केल्याची आणि वाईट सेवा देऊन दुकानदाराने त्यांना मानसिक त्रास दिल्याची बाब मान्य करीत खर्च मिळण्यास पवार पात्र असल्याचे नमूद केले. सूटच्या एकूण खर्चासह दावा दाखल केल्यापासून म्हणजे एप्रिल २०१० पासूनच त्यावर १० टक्के व्याज देण्याचे आदेश मंचाने दुकानदाराला दिले. तसेच चार हजार रुपयांची नुकसान भरपाई आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी आलेला खर्चही संबंधित दुकानदाराने पवार यांना द्यावा, असे आदेश मंचाने दिले.