कलांगण या संस्थेने छंदवर्गासंबंधी दिलेल्या जाहिरातीमधील आश्वासन पाळले नाही म्हणून ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने या संस्थेला दणका देत छंदवर्गाचे शुल्क आणि नुकसानभरपाई, असे सुमारे ३५ हजार रुपये नऊ टक्के व्याज दराने देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम तक्रार झालेल्या दिवसांपासून लागू करण्यात आली असून दंडाची रक्कम तीस दिवसांत भरण्याचे आदेशही मंचाने दिले आहेत.
मुंबई येथील वर्षां भावे यांच्या कलांगण या संस्थेने ठाणे शहरात गंमतजंमत छंदवर्गाचे आयोजन केले होते. ८ ते १३ एप्रिल या कालावधीत हे वर्ग घेण्यात आले होते. ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी हे वर्ग होते. मुलांना पाच दिवसांमध्ये संगीताचे प्रशिक्षण देण्यात येईल आणि सहाव्या दिवशी जाहीर कार्यक्रमात मुले सादरीकरण करू शकतील, अशा स्वरूपाची जाहिरात संस्थेने दिली होती. त्यासाठी प्रत्येक मुलाकडून अठराशे रुपये शुल्क घेण्यात आले होते. हे वर्ग पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक मुलाला सादरीकरणाच्या दिवशी तीन तासांच्या कार्यक्रमात अवघ्या १३ मिनिटांची वेळ सादरीकरणासाठी देण्यात आली होती. त्यानंतर मात्र ही मुले संगीतातील वेणू या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत की नाही, याविषयी संयोजक सांगू शकले नाहीत. त्यामुळे पालकांचा हिरमोड झाला, असे तक्रारदार डॉ. विजया टिळक, मकरंद मुळे आणि इतरांचे म्हणणे होते. याप्रकरणी त्यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली होती.
मंचासमोर झालेल्या सुनावणीत वर्षां भावे यांच्या वकिलांनी दावा केला की, तक्रार करणाऱ्यांपैकी काही जण पालक नाहीत त्यामुळे ते ग्राहक ठरू शकत नाहीत. छंदशाळेत प्रवेश घेतल्यानंतर पाच दिवस तीन तासांच्या प्रशिक्षणाने तीन ते सहा वयोगटातील छोटय़ा मुलांना संगीत चांगल्यापैकी समजले पाहिजे अशी अपेक्षा बाळगून ही तक्रार करण्यात आली आहे, असा बचाव वर्षां भावे यांच्या वकिलांनी केला.
वर्तमानपत्रात छंदशाळेविषयी निवेदन देणे म्हणजे काही करार नाही, कोणतीही चूक नसतानाही आपण तक्रारदार पालकांच्या मुलांसाठी पुन्हा विनामूल्य छंदशाळा घेण्याची तयारी दाखवली होती, असा युक्तिवादही बचाव पक्षातर्फे करण्यात आला. या प्रकरणाचा निकाल मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर आणि सदस्य ना. द. कदम यांनी दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा