दूषित खाद्यतेल विकणे एका खाद्यतेल उत्पादक कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. सात वर्षांपूर्वी पाचशे मिलीलीटरच्या २९ रुपयांच्या खाद्यतेलाच्या बाटलीत सापडलेल्या मच्छरसदृश्य किटकासाठी संबंधित ग्राहकाला कंपनीने एक लाख पाच हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई जिल्हा ग्राहक वाद निवारण मंचाने नुकतेच दिले.
दूषित खाद्यतेलाचा पुरवठा करण्यासाठी संबंधित कंपनी जबाबदार असून दूषित खाद्यतेलाची ग्राहकाला विक्री करून कंपनीने त्याचे आर्थिक नुकसान करण्याबरोबरच त्याला मानसिक त्रासही दिल्याचे मंचाने नुकसान भरपाईचे आदेश देताना नमूद केले आहे. २००५ सालापासून म्हणजेच खाद्यतेल खरेदी केल्यानंतरपासून ग्राहकाला त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, असेही मंचाने निकालात म्हटले आहे.
सॅम लकडावाला हे ‘एस. भारतकुमार अॅण्ड कंपनी’ या कंपनीचे नेहमीचे ग्राहक होते. १८ ऑक्टोबर २००५ रोजी त्यांनी कंपनीतून ‘जेमिनी सनफ्लॉवर ऑईल’ची पाचशे मिलीलीटरची बाटली २८.८० रुपयांमध्ये खरेदी केली. पण त्यांनी बाटली उघडली तेव्हा त्यात मच्छरसदृश्य किटक आढळून आला. लकडावाला यांनी ती बाटली पुन्हा दुकानदाराकडे परत करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुकानदाराने त्यांना डिलरकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर दुकानदार-डिलर-कंपनी अशा तिन्ही ठिकाणी वारंवार हेलपाटे घालूनही लकडावाला यांना रिकाम्या हातीच परतावे लागले. अखेर जानेवारी २००६ मध्ये त्यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली. लकडावाला यांच्या तक्रारीची दखल घेऊन मंचाने दुकानदार आणि डिलर यांना वारंवार समन्स बजावले.  दरम्यान, २००८ मध्ये तेलाची बाटली चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली. चाचणीच्या वेळी त्यात काळ्या रंगाचा किटक आढळून आला. परंतु लकडावाला यांनी किटक असलेल्या खाद्यतेलाच्या बाटलीची छायाचित्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे त्यांचा दावा खोटा असल्याचा आरोप खाद्यतेल कंपनीने मंचासमोर केला.

Story img Loader