राज्य सरकारने लागू केलेल्या स्थानिक संस्था करातून बहुतांशी जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले असले, तरी एलबीटीचा बागुलबूवा उभा करत किरकोळ बाजारात सर्वसामान्य ग्राहकांची लूटमार करण्यात येत आहे. मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईतील भाजी बाजारांत जवळपास प्रत्येक भाजीचा दर किलोमागे तीन ते पाच रुपयांनी वाढविण्यात आल्याचे दिसत असून, किराणा बाजारात डाळींच्या किंमतीही फुगवल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. कहर म्हणजे, ठाणे, नवी मुंबईतील काही रद्दी विक्रेत्यांनीही एलबीटीचे कारण पुढे करुन रद्दीची किंमत किलोमागे एक रुपयानी कमी केल्या आहेत.
एवढेच नव्हे, तर सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचे षड्यंत्रही काही व्यापाऱ्यांनी रचल्याचे दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, एलबीटीच्या माध्यमातून दूध, भाज्या, फळे, अन्नधान्य, मासे, हॉटेलांमधील खाद्यपदार्थ इत्यादींवर सात टक्के एवढा कर आकारला जाणार असल्याची ढळढळीत खोटी माहिती देणारी पत्रके वाटली जात आहेत. वाशीतील एपीएमसी बाजार तसेच काही महत्वाच्या बस आगारांमध्ये सर्वसामान्यांची दिशाभूल करणारे बॅनरही लावण्यात आले आहेत.
व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या एलबीटीविरोधी बंदमध्ये फळे, भाजीपाला, कांदा-बटाट बाजारातील व्यापारी अद्याप सहभागी नाहीत. असे असताना एलबीटीमुळे भाजी महाग झाल्याची ओरड काही किरकोळ विक्रेत्यांनी सुरू केली आहे. या विक्रेत्यांनी सर्वच भाज्यांचे दर पाच रुपयांनी वाढविले असल्याच्या तक्रारी आहेत. वाशीतील किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा कांदा २२ ते २५ रुपयांना (घाऊक बाजारात १२ ते १४ रुपये किलो) विकला जात आहे. बंदचा फायदा घेऊन काही किराणा विक्रेत्यांनी तुर तसेच मसूर डाळ किलोमागे ८५ ते ९० रुपयांनी विकण्यास सुरुवात केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा