मुंबई : विलेपार्ले येथील पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या कॅप्टन विनायक गोरे पुलाला एका अवजड कंटेनरने शुक्रवारी धडक दिल्याचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने मुंबईत पसरले आणि खळबळ उडाली. या अपघातामुळे पुलाला धोका निर्माण झाल्याचीही चर्चा रंगली झाली. मात्र हा कंटेनर पुलाजवळील अवजड वाहनांना अटकाव करणाऱ्या लोखंडी खांबावर (हाईट बॅरिअर) धडकला असून पूल सुरक्षित असल्याचा दावा मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा – मुंबई : उद्घाटनानंतर एक वर्ष लोटले तरी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह बंदच
विलेपार्ले परिसरातील कॅप्टन विनायक गोरे पुलाखालून सकाळी १०.३० च्या सुमारास एक अवजड कंटेनर जात होता. त्याच वेळी हा कंटेनर तेथील लोखंडी खांबावर धडकला. पुलाच्या सुरक्षितततेसाठी उभारलेला हा भांग मोडल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाल्याचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरले. मात्र कंटेनर पुलाला धडकला नसून पुलाच्या जवळ अवजड वाहनांना बंदी घालण्यासाठी लावलेल्या हाईट बॅरिअरवर धडकला, अशी माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली. त्यामुळे पुलाला कोणताही धोका नसून पूल सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.