लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: देशातील ग्लोव्हज उत्पादकांनी केलेल्या तक्रारीवरून आयात करण्यात येणारे वैद्यकीय ग्लोव्हजचे जवळपास १०० कंटेनर जेएनपीटी, मुंद्रा यासह चार बंदरांवर अडविण्यात आले आहेत. या ग्लोव्हजचा दर्जा तपासल्याचा अहवाल सादर झाल्यानंतरच ते प्रत्यक्षात बाजारात उपलब्ध होतील. मात्र त्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागणार असून पुढील काही दिवस राज्यामध्ये ग्लोव्हजचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
देशातील वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणाऱ्या जवळपास ३० ते ४० टक्के ग्लोव्हजचे भारतीय कंपन्यांकडून उत्पादन करण्यात येते. तर उर्वरित ६० ते ७० टक्के ग्लोव्हज विविध ५० कंपन्या आयात करतात. मात्र आयात करण्यात येत असलेले ग्लोव्हज भारतीय मानांकनानुसार नसून निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार देशातील काही ग्लोव्हज उत्पादकांनी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे (सीडीएससीओ) केली होती. याची दखल घेत देशातील विविध कंपन्यांनी आयात केलेल्या ग्लोव्हजचे १०० कंटेनर सीडीएससीओने मुंबईतील जेएनपीटी आणि गुजरातमधील मुंद्रा बंदरासह अन्य दोन बंदरांवर अडविले आहेत.
आणखी वाचा- मुंबईः जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
हे ग्लोव्हज भारतीय मानांकनानुसार निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार आल्याने त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल सादर झाल्यानंतरच हे ग्लोव्हज बाजारामध्ये उपलब्ध होणार आहेत. मात्र प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल सादर होण्यासाठी साधारणपणे २१ दिवसांचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत हे ग्लोव्हज गोदामामध्येच ठेवण्यात येणार आहेत. यामुळे देशामध्ये ग्लोव्हजचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्लोव्हजचा तुटवडा निर्माण झाल्यास करोनाचा सामना करणे अडचणीचे ठरणार आहे.
देशातील उत्पादकांच्या ग्लोव्हजची तपासणी करणे आवश्यक
देशात आयात करण्यात येणारे ग्लोव्हज हे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार उत्पादक कंपन्यांकडून करण्यात आली. पण देशातील निर्मिती होणाऱ्या ग्लोव्हजचीही चाचणी होत नाही. त्यामुळे हे ग्लोव्हज भारतीय मानांकनानुसार आहेत की नाहीत याची तपासणी करणे आवश्यक आहे. सीडीएससीओने भारतीय कंपन्यांच्या ग्लोव्हजचीही तपासणी करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केली आहे.