कचऱ्यातील जलवाहिन्यांविरोधात न्यायालयात लढा देण्यास मुंबईकर सरसावले
शहरात रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये पडलेल्या कचऱ्याचे कोणालाही नवल वाटत नाही. याच कचऱ्यातून, सांडपाण्याच्या गटारातून जाणाऱ्या जलवाहिन्याही तेवढय़ाच परिचयाच्या.. चुकीचे असले तरी सवयीने ते सर्वानी स्वीकारले आहे. ‘स्वच्छ मुंबई’ अभियानाची धूमधडाक्यात सुरुवात करणाऱ्या आणि आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न पाहणाऱ्या महानगरपालिकेलाही स्वच्छ पाणीपुरवठय़ाच्या मुलभूत गरजेबाबत काही वाटेनासे झाले आहे. मात्र दूषित पाण्यामुळे दरवर्षी लाखभर रहिवाशांना कावीळ आणि पोटविकार होत असताना पालिकेवर गुन्हा दाखल करण्यासाठी विलेपार्ले येथील काही कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे, खड्डे, कचरा आदी प्रश्नांबरोबरच पालिकेत आता न्यायालयाच्या स्तरावर पाण्याचा प्रश्नही पेटण्याची शक्यता आहे.
पालिकेलाही या वस्तुस्थितीची कल्पना आहे. मात्र पालिकेने त्याकडे अनेक वर्ष जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. जलवाहिन्यांशेजारचा परिसर स्वच्छ करणे अशक्य असल्याचे सांगून जलपुरवठा विभागाकडूनही हात वर केले जातात. त्यामुळे पाणीपुरवठय़ासारख्या सर्वात मूलभूत गोष्टीकडे लक्ष वळवण्यासाठी विलेपार्ले येथील अशोक पै व त्यांचे सहकारी गेले काही महिने सतत पाठपुरावा करत आहेत. पै यांनी इंदिरा नगर, मरोळ पाइपलाइन, अंधेरी पूर्व या भागातील कचऱ्यातून, गटारातून जाणाऱ्या जलवाहिन्यांबाबत पालिकेकडे तक्रारी केल्या. मात्र त्यांना पालिकेने ठरावीक साच्यातील उत्तरे दिली. त्यानंतर पै यांनी अंधेरीच्या सहार पोलीस स्थानकात लिखित स्वरूपात तक्रार दिली.
पोलिसांनाही याबाबत सहानुभूती वाटत असली तरी त्यांनी तक्रार नोंदवून घेण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. आधी पाहणी करतो, मग पाहूया अशा छापाची उत्तरे पै यांना देण्यात आली. अर्थात या कार्यकर्त्यांनी हार मानली नसून पाणीप्रश्नाचा लढा हाती घेतला आहे. ‘पालिका व पोलिसांकडे तक्रारी करूनही काही झाले नाही तर जनहित याचिकेचाही मार्ग आहे. कचऱ्याबाबत आधीच पालिकेला तोंडघशी पडावे लागले आहे. आता पाणीपुरवठय़ाबाबतही उत्तर द्यावे लागेल,’ असे अशोक पै यांनी सांगितले.
पाण्यात माती आणि किडेही
ठाणे, नाशिकच्या तलावातून काहीशे किलोमीटर पाणी आणल्यानंतर लाखो लहान-मोठय़ा जलवाहिन्यांमधून ते घराघरांत पोहोचवले जाते. मात्र या जलवाहिन्यांचा शेजारचा परिसर मात्र अत्यंत गलिच्छ असतो. नाल्याच्या बाजूने, गटाराच्या आतून, सांडपाण्याच्या वाहिनीशेजारून जलवाहिन्या जातात. या वाहिन्यांना तडे गेले की आजुबाजूची घाण पाण्यात मिसळून ते दूषित होते व हेच दूषित पाणी ग्राहकांना पुरवले जाते. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या काळात जलवाहिनी फुटण्याच्या चाळीस हजारांहून अधिक तक्रारी पालिकेकडे आल्या. मातकट रंगाचे किडे असलेल्या पाण्याचा पुरवठा होणे ही घटना अनेकदा घडते. दरवर्षी कावीळ तसेच दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार झाल्याने सरकारी रुग्णालयात आलेल्यांची संख्या एक लाखाहून अधिक असते. प्रत्यक्षात केवळ ३० टक्के रुग्ण पालिका किंवा सरकारी रुग्णालयात जात असल्याने प्रत्यक्षात पोटदुखी झालेल्यांची संख्या तीन ते चार पट अधिक असण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा