मुलुंड आणि ठाण्यातील काही भागातील नागरिकांना २० जानेवारीपासून पुढचे काही दिवस दुषित पाण्याचा पुरवठा होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून जल शुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या भूमीगत जलबोगद्याला ठाणे विभागात कूपनलिकेचे काम सुरू असताना हानी झाली आहे. या जलबोगद्याची दुरुस्ती शुक्रवारपासून हाती घेण्यात येणार आहे.
हेही वाचा- मेलबर्नचे मराठी नाटक महाराष्ट्र दौऱ्यावर!
ठाणे जिल्ह्यातून जलबोगद्याद्वारे मुंबईत आणले जाणारे पाणी आधी भांडुप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात नेले जाते. मात्र जल शुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या भूमीगत जलबोगद्याला ठाणे विभागात कूपनलिकेचे काम सुरू असताना हानी झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी शुक्रवार, २० जानेवारीपासून हा जलबोगदा बंद करावा लागणार आहे. या कारणास्तव भांडुप संकुलापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जुन्या वितरण व्यवस्थेचा वापर करण्यात येणार आहे.
हेही वाचा- तरुणांमध्ये का वाढतंय उच्च रक्तदाबाचे प्रमाण? गेल्या १० वर्षांत वाढली रुग्णसंख्या
या भागात दुषित पाणीपुरवठा
मुलुंडमधील वीणा नगर, वैशाली नगर, स्वप्ननगरी, योगी हिल्स तसेच मुलुंड पश्चिम विभागातील तांबे नगर चेकनाका व ठाणे येथील किसन नगर या परिसरात शुक्रवार, २० जानेवारी २०२३ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रक्रियेशिवाय पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे मुलुंड पश्चिम येथील नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कृपया पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.