मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मुलींच्या नवीन वसतिगृहातील ४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा असा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे गेल्या दोन – तीन दिवसांपासून विद्यार्थिनी हैराण असून वसतिगृहातील दूषित पाण्यामुळे त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे वसतिगृहातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी मुंबई विद्यापीठाच्या अभियंता विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल सोमवारी येणार असून या अहवालावरून मुलींना नेमका कशामुळे त्रास झाला हे स्पष्ट होईल.
कलिना संकुलातील मुलींच्या नवीन वसतिगृहाचे एक वर्षापूर्वी उद्घाटन करण्यात आले होते. परंतु नळजोडणी न झाल्यामुळे उद्घाटनानंतर वसतिगृहाला तब्बल आठ महिने टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. आता नळजोडणी होऊन मुंबई महानगरपालिकेकडून नियमितपणे पाणीपुरवठा होत आहे. परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विद्यार्थिनींना त्रास होत आहे. या वसतिगृहातील एका कुलरमधील दूषित पाण्यामुळे विद्यार्थिनींना त्रास झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कलिना संकुलातील आरोग्य केंद्र दुपारी ४ च्या सुमारास बंद होत असल्यामुळे काही विद्यार्थिनींना वेळेत उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे काहींनी स्वतःजवळील औषधे घेतली, तर काही विद्यार्थिनींनी संकुलाबाहेरील डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले.
हेही वाचा…मुंबईकरांची काहिली कमी होणार
‘वसतिगृहातील विद्यार्थिनी या कलिना संकुलातील विविध विभागांत शिकत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनी विभागासह विविध ठिकाणचे पाणी पितात आणि पदार्थ खातात. तसेच या विद्यार्थिनी देशातील विविध राज्यातील असून त्यांना कोरड्या हवामानाची सवय आहे. परंतु मुंबईच्या हवेतील आद्रता वाढल्यामुळे विद्यार्थिनींना त्रास होत आहे. या सर्व विद्यार्थिनींवर आरोग्य केंद्रात औषधोपचार सुरू आहेत. तसेच काही विद्यार्थिनी त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांकडून सल्ला घेत आहेत’, असे मुलींच्या नवीन वसतिगृहाच्या अधिक्षक प्रा. मधुरा कुलकर्णी यांनी सांगितले.
‘कलिना संकुलातील आरोग्य केंद्र २४ तास सुरू ठेवावे आणि तिथे पुरेशा प्रमाणात डॉक्टर्स असावे. यासंदर्भात कुलगुरूंना पत्र दिले असून फोनवरून चर्चाही केली आहे’, असे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा…पनवेल – नांदेडदरम्यान ४० उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
अनेक विद्यार्थिनींना प्रामुख्याने उष्माघातामुळे त्रास झाला आहे. कलिना संकुलातील आरोग्य केंद्रात विद्यार्थिनींवर उपचार करण्यात आले आहेत. त्यांना योग्य ती औषधेही देण्यात आली. आता सर्व विद्यार्थिनींची तब्येत ठीक आहे. – डॉ. बळीराम गायकवाड, प्रभारी कुलसचिव, मुंबई विद्यापीठ