मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूच्या चौकशीसाठी तिच्या वडिलांनी केलेल्या याचिकेसंदर्भात वकील निलेश ओझा यांनी सुनावणीआधीच पत्रकार परिषद घेऊन त्यादरम्यान उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीविरुद्ध निंदनीय व बदनामीकारक विधाने केली होती. त्याची उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या विशेष पीठाने मंगळवारी दखल घेतली. तसेच, दिशाच्या वडिलांचे वकील ओझा यांच्याविरुद्ध स्वतःहून अवमान कारवाई सुरू केली. त्याचाच भाग म्हणून न्यायालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर अवमानप्रकरणी कारवाई का करू नये याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले.

दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ओझा यांच्यामार्फत केलेल्या याचिकेवर २ एप्रिल रोजी सुनावणी होणार होती. मात्र, त्याआधी १ एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ओझा यांनी उच्च न्यायालयाच्या संबंधित न्यायमूर्ती आणि माजी मुख्य न्यायमूर्तींबाबत बदनामीकारक विधाने केली. त्यांची ही विधाने अवमानकारक असल्याचे स्पष्ट होते, असे विशेषपीठाने नमूद केले. तसेच, ओझा यांच्यावर अवमान कारवाई सुरू करत असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी, युट्यूब आणि एका मराठी वृत्तवाहिनीला संबंधित पत्रकार परिषदेची चित्रफित तात्काळ हटवण्याचे आदेश दिले. याशिवाय, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत ही चित्रफित पुन्हा प्रसिद्ध करण्यासही मज्जाव केला.

सालियन यांच्या याचिकेवरील सुनावणीआधीच ओझा यांनी पत्रकार परिषदेत उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्ती आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्तींविरुद्ध केलेली विधाने ही न्यायालयाची प्रतिष्ठा मलीन करणारी आहेत, असा ठपका उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती महेश सोनात, न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या पाच सदस्यीय विशेषपीठाने ओझा यांच्यावर ठेवला. ओझा यांनी केलेले विधान फौजदारी अवमानाच्या कक्षेत येते, असेही विशेषपीठाने अधोरेखीत केले व ओझा यांना नोटीस बजावण्याचे आदेश महानिबंधक कार्यालयाला दिले.

न्यायालयाचे म्हणणे…

वकील ओझा यांची पत्रकार परिषदेतील विधाने न्यायालय आणि विद्यमान न्यायमूर्तींच्या अधिकाराला मलीन करण्यासाठी जाणूनबुजून केल्याचे दिसून येते. विधाने निंदनीय आणि बदनामीकारक असल्याचेही विशेषपीठाने आपल्या आदेशात नमूद केले. अशा प्रकारच्या विधानांतून न्यायालयाची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न केला गेला असून ही विधाने न्याय प्रशासनात अडथळा निर्माण करणारी असल्याचेही आदेशात म्हटले आहे. सालियन यांच्या याचिकेवर ज्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर २ एप्रिल रोजी सुनावणी होणार होती. त्या न्यायमूर्तींबाबत ओझा यांनी एक दिवस आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भ्रष्टाचाराचे आरोप केले. ओझा किंवा त्यांच्या अशिलाला विद्यमान न्यायमूर्तींविषयी काही आक्षेप होते, तर याचिकेवरील सुनावणीच्या वेळी संबंधित न्यायमूर्तींपुढे ते मांडू शकले असते. तथापि, तसे करण्याऐवजी ओझा यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित न्यायमूर्तींवर आरोप केल्याचे, न्यायालयाने म्हटले आहे.

प्रकरण काय ?

दिशा हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची, तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांना आरोपी करून त्यांना अटक करण्याची प्रमुख मागणीही याचिकेतून केली आहे. बॉलिवूड पार्टीमध्ये आदित्य ठाकरे, सूरज पंचोली आणि इतरांच्या उपस्थितीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होताना दिशाने पाहिल्यामुळे तिची हत्या केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून त्यानंतर तिचा मृतदेह इमारतीजवळ ठेवून ती वरून पडल्याचे भासविण्यात आल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.