‘देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज’ ही बिरुदावली नवी मुंबई महापालिका मोठय़ा अभिमानाने मिरवू लागली आहे. मात्र या सगळ्यात उंच राष्ट्रध्वजासाठी उभारलेल्या ध्वजस्तंभावर, राष्ट्रध्वजाच्याही वर सीसीटीव्ही कॅमेरा लावून या बिरुदावलीला गालबोटही लावले आहे. ‘राष्ट्रध्वज आचारसंहिते’नुसार ज्या स्तंभावर राष्ट्रध्वज फडकावला जातो त्या स्तंभावर कोणतीही जाहिरात असणे अपेक्षित नाही. मात्र नवी मुंबई प्रशासनाने ध्वजस्तंभावरच ध्वजाच्याही वर सीसीटीव्ही कॅमेरा लावून या नियमावलीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. देशभरात अगदी मोजक्या ठिकाणी उंच खांबावर राष्ट्रध्वज अभिमानाने फडकत आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी खासदार डॉ. संजीव नाईक यांना, ‘असा उंच ध्वज तुम्ही नवी मुंबईत का उभारत नाहीत’, अशी विचारणावजा सूचना काही महिन्यांपूर्वी केली होती. नोइडा आणि बंगळुरु येथे असे अनुक्रमे २१६ आणि २१० फूट उंच राष्ट्रध्वजाचे स्तंभ आहेत. नाईक यांना ही संकल्पना आवडली. त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करून केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सर्वात उंच (२२५ फूट) राष्ट्रध्वज उभारण्याची विशेष परवानगी घेतली. मात्र ही परवानगी देताना गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत.
राष्ट्रध्वजासाठी २२ जुलै १९४७ रोजी एक आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. राष्ट्रध्वजाच्या वर काहीही असता कामा नये. तसेच राष्ट्रध्वजाच्या स्तंभावर जाहिराती लावू नयेत, असे या आचारसंहितेत म्हटले आहे. परंतु नवी मुंबईतील या ध्वजस्तंभावर या राष्ट्रध्वजाच्याही वर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे. या कॅमेऱ्यामुळे त्या कंपनीची जाहिरात होत आहे.
हा हाय डेफिनेशन कॅमेरा पालिका मुख्यालयावर २४ तास नजर ठेवण्यासाठी बसवण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या टप्प्यात आजूबाजूच्या सर्व परिसरासह थेट पामबीच मार्गसुद्धा येतो. तेथून जाणाऱ्या सर्व वाहनांची नोंद या कॅमेऱ्यात होत आहे. मात्र या कॅमेऱ्यासाठी समांतर यंत्रणा उभारण्याची गरज होती. पालिकेने हे काहीच केले नाही. त्याच वेळी आणखी एक घोळ प्रशासनाने करून ठेवला आहे. हा ध्वजस्तंभ इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस उभारण्यात आला आहे. नियमानुसार कार्यक्रमस्थळी असलेल्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूस राष्ट्रध्वज असतो. मंगळवारी या ध्वजस्तंभाचे उद्घाटन झाले तेव्हा या नियमाचेही उल्लंघन झाले. या ध्वजस्तंभाच्या डाव्या बाजूस कार्यक्रमाचे व्यासपीठ आले. या दोन ‘घोडचुकां’वरून नवी मुंबईत मोठेच वादळ उठले आहे. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा गुन्हा नोंदविण्याची मागणी होऊ लागली आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रध्वजाची काळजी घेण्यासाठीच हा कॅमेरा लावल्याचे हास्यास्पद स्पष्टीकरण पालिकेचे सह अभियंता जी. व्ही. राव यांनी दिले. मात्र या कॅमेऱ्यातून सपूर्ण परिसराचे चित्रीकरण केले जात असल्याचे याच राव यांनी सोमवारी आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांना मोठय़ा अभिमानाने दाखविले होते.