सुरेश प्रभू यांची घोषणा
सावंतवाडी : मी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुक लढविली नव्हती, तशीच यापुढेही निवडणूक लढविणार नाही. मात्र प्रत्येक माणसाशी संबधित असलेल्या पर्यावरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या कणकवलीतील मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले. राजकारणात आल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्गात विकासाची पायाभरणी केली असल्याचे ते म्हणाले.
हवामानात बदल होत असल्याने वादळांची संख्या वाढतेय. अवकाळी पाऊस वर्षभर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. राजकारण विरहीत प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळेच निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रभूंनी स्पष्ट केले.
सीएचा व्यवसाय चांगला चालत असताना राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी घरातील मंडळींचा विरोध होता. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे राजकारणात आलो आणि खासदार झाल्याचे त्यांनी नमूद केले.