दिल्लीतील महाराष्ट्र सदनासह अन्य सरकारी कंत्राटे देताना राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळालेल्या कथित लाचप्रकरणी विशेष पथकामार्फत सुरू असलेल्या तपासात भुजबळ यांचे पुत्र पंकज तसेच पुतणे समीर यांना या आठवडाभरात चौकशीसाठी बोलाविले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या दोघांच्या नावे अनेक कंपन्या असून यापैकी काही कंपन्यांमध्ये हस्तांतरित झालेल्या कोटय़वधी रुपयांच्या आरोपाबाबत त्यांच्याकडे प्रामुख्याने विचारणा केली जाणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
आम आदमी पार्टीने दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश मोहित शाह यांनी विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच अंमलबजावणी mu01महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष पथकामार्फत सध्या चौकशी सुरू आहे. या समितीला २८ फेब्रुवारीपर्यंत उच्च न्यायालयात अहवाल सादर करावयाचा आहे. त्यामुळे पथकाने गेल्या काही दिवसांपासून अनेकांची चौकशी केली आहे. यामध्ये भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच विविध छोटी-मोठी कामे करणाऱ्या कंत्राटदारांनाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. येत्या काही दिवसांत आणखीही काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या चौकशीतून पुढे आलेल्या बाबींबाबत स्पष्टीकरण घेण्यासाठी समीर व पंकज भुजबळ यांना आठवडाभरात बोलाविले जाण्याची शक्यता आहे. या दोघांशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर संचालक असलेल्या सर्वाची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याइतपत पुरावे हाती लागलेले आहेत, परंतु न्यायालयाच्या आदेशानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन उभारणीत दिल्या गेलेल्या लाचेच्या रकमेसह अन्य दहा आरोपांबाबत हे पथक चौकशी करीत आहे. समीर व पंकज भुजबळ हे संचालक असलेल्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित झालेल्या मोठय़ा रकमांच्या आरोपाबाबत आतापर्यंत या पथकाला समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. अनेक बडय़ा कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठमोठय़ा रकमा हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. त्याबाबतही चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader