मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने गृह खात्याने तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीतजास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. गृह खात्याच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा >> आता पोलीसही कंत्राटी ;मुंबई पोलीस दलात तीन हजार पदे भरण्याचा निर्णय
“राजकारणात पक्ष आणि नेते फोडाफोडीची नवीन प्रथा सुरू करुन महाराष्ट्राचं शालीन राजकारण भाजपाने मलीन केलं. त्याप्रमाणेच कंत्राटी पोलिस भरती करून आधीच बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण वाट लावण्याचा तर हा डाव नाही ना? अशी शंका येते. लाखो युवा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असताना त्याकडं दुर्लक्ष करून कंत्राटी भरती करणाऱ्या राज्य शासनाचा तीव्र निषेध!”, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.
पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाई आहे. राजकीय नेत्यांच्या संरक्षणामुळे आणखी मनुष्यबळाची गरज आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. त्यामुळे कंत्राटी पोलीस भरती करण्याचा पोलीस आयुक्तांचा आग्रह होता, असे गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कंत्राटी भरती का?
राज्य सरकारने २१ जानेवारी २०२१ रोजी ७,०७६ शिपाई आणि ९९४ वाहनचालकांच्या भरतीला मंजुरी दिली आहे.ही भरतीप्रक्रिया आणि या शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन हे मनुष्यबळ दाखल होण्यास दोन वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत कंत्राटी पोलिसांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी केली जाणार आहे.