मुंबई : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत दवाखाने चालवण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि औषध निर्माता यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून अर्जाचा नमुना केवळ ३० नोव्हेंबरपर्यंतच प्रदर्शित केला जाणार आहे.
हिंदुहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून १७ नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘हिंदुहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांवरील भार कमी करण्यासाठी मुंबईत प्रत्येक ५०० मीटरच्या परिघात एक आपला दवाखाना सुरू करण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे. वस्त्यांमधील या दवाखान्यांमध्ये उपचार, औषधे मोफत मिळतील अशी ही योजना आहे.
हेही वाचा – २६/११ ला दहशतवादी पाहिल्याचा पोलिसांना दूरध्वनी; माहिती खोटी असल्याचे निष्पन्न
गेल्या वर्षभरात १८८ दवाखाने सुरू झाले असून त्यात २१ लाख नागरिकांनी उपचार घेतले आहेत. दवाखान्यांची संख्या मार्च २०२४ पर्यंत अडीचशेवर नेण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. हे दवाखाने सकाळपासून रात्री उशीरापर्यंत सुरू असतात. रुग्णांना औषधोपचारांबरोबरच रोग निदान, चिकित्सा यांचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र दवाखान्यांची संख्या वाढत असल्यामुळे मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे पालिकेने या दवाखान्यांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने घेण्याचे ठरवले आहे.
इच्छुक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि औषध निर्माता यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. पात्र उमेदवारांची प्रतीक्षायादी तयार करण्यात येणार असून आवश्यकतेप्रमाणे त्यांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली. रिक्त पदानुसार व जसेजसे आपला दवाखाना केंद्र कार्यान्वित करण्यात येतील त्यानुसार नियुक्तीचे आदेश दिले जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.