मुंबई : मुंबई महानगरपालिकेने विविध रुग्णलयांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय घेताना सध्या रोजंदारी, बहुउद्देशीय कामगार व कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार नसून, या कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करून नवीन पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयातील कार्यरत असलेल्या या कामगारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

मुंबईतील महानगरपालिकेच्या सर्व मुख्य रुग्णालयांमध्ये, तसेच आरोग्य विभागामध्ये कंत्राटी, बहुउद्देशिय, रोजंदारी पद्धतीने कामगारांची भरती करण्यात येते. या कर्मचाऱ्यांनी करोनाकाळात प्रामाणिकपणे काम केले. मात्र मुंबई महानगरपालिकेने सध्या नवीन कामगार भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व कामगारांना कामावरून काढून टाकून त्यांच्या जागी नवीन कामगारांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे मागील १० ते १५ वर्षे काम करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या कामगारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या सर्व कामगारांना महानगरपालिकेतर्फे कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत, त्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, विमा योजना यांसारख्या कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. त्यांना वेळेवर वेतनही मिळत नाही.

हेही वाचा >>>गुंगीचे औषध देऊन दोघांनी बलात्कार केल्याचा तरूणीचा दावा; तपासणीत आरोपांना अद्याप पुष्टी मिळालेली नाही, एकाला अटक

केईएम रुग्णालयामध्ये रोजंदारीवर १११ कर्मचारी, २५० बहुउद्देशिय कामगार आणि २११ कंत्राटी कामगार आहेत. यापैकी बहुतांश कर्मचारी मागील १० ते १५ वर्षांपासून रुग्णालयात काम करीत आहेत. यापैकी अनेक कामगारांचे वय झाले आहे. त्यांनी करोना काळात न घाबरता काम केले होते. या कर्मचाऱ्यांना मासिक १७ ते १८ हजार रुपये इतके वेतन मिळते. करोना काळात त्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले. त्यावेळी काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला. कामाच्या ताणामुळे अनेक जण व्याधीग्रस्त झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने त्यांना औषधोपचाराचा खर्च स्वत: करावा लागतो. यांना कोणतीही रजा भरपगारी मिळत नाही. बहुउद्देशिय, रोजंदारी व कंत्राट पध्दतीने काम करणारी ही मुले उच्चशिक्षित असूनही ती पडेल ती कामे करीत आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेने नव्या भरतीत डावलल्याने हे कर्मचारी नाराज झाले आहेत. बहुउद्देशिय, रोजंदारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना पदभरतीमध्ये सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेने पुढाकार घेतला. या सर्व कर्मचाऱ्यांनी ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. यावेळी राज ठाकरे यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेचे उपाध्यक्ष दिलीप दळवी यांनी दिली.