मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील काही स्थानकांत पावसाचे पाणी शिरल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराला नुकताच दोन कोटी रुपये दंड ठोठावला आहे. संथगतीने आणि हलगर्जीपणे केलेले काम कंत्राटदाराला भोवले असून पावसाळ्यात कामादरम्यान आवश्यक ती काळजी न घेतल्याने मेट्रो स्थानकात पावसाचे पाणी शिरल्यामुळे एमएमआरसीने या कंत्राटदारावर दंडत्मक कारवाई केली आहे.
एमएमआरसीने ३३.५ किमी लांबीच्या भुयारी ‘मेट्रो ३’ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्पा शक्य तितक्या लवकर वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे. त्यानुसार सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. असे असताना आता सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होण्याची भिती निर्माण झाली आहे. ‘मेट्रो ३’च्या पहिल्या टप्प्यातील काही मेट्रो स्थानकांत पावसाचे पाणी शिरले. मेट्रो स्थानकात अशाप्रकारे पावसाचे पाणी शिरल्यास सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमएमआरसीने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार जे. कुमार आणि सीआरटीजी (संयुक्त) या कंत्राटदार कंपनीला दोन कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या कंत्राटदाराकडे पहिल्या टप्प्यातील आरे डेपो, सीप्झ, मरोळसह सहा मेट्रो स्थानकांची कामे आहेत. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस होतो. ही बाब लक्षात घेता एमएमआरसीने सर्व कंत्राटदारांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेश दिले होते. असे असताना पहिल्या टप्प्यातील काही मेट्रो स्थानकांत पावसाचे पाणी शिरले.
हेही वाचा >>>अमलीपदार्थ तस्करीचे प्रकरण : ममता कुलकर्णीविरोधातील गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द
एमएमआरसीने कंत्राटदावर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर नोटीस बजावली आहे. तसेच त्याला दोन कोटी रुपये दंड ठोठावला आहे. त्याच वेळी हा कंत्राटदार संथगतीने काम करीत असून त्याचा प्रकल्प पूर्णत्वावर परिणाम होत असल्यामुळेही दंड आकारण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिला टप्पा येत्या काही दिवसात कार्यान्वित करण्याचे नियोजन असताना या कंत्राटदाराकडील स्थानकांतील अनेक कामे अपूर्ण असल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे पहिल्या टप्प्यास विलंब होण्याची भितीही एमएमआरसीने व्यक्त केली आहे. कंत्राटदाराने कामास वेग देत शक्य तितक्या लवकर काम पूर्ण करावे, असे आदेशही एमएमआरसीने दिले आहेत. निश्चित वेळेत ही कामे पूर्ण झाली नाहीत, तर कडक कारवाई करण्याचा इशाराही एमएमआरसीने दिला आहे.