मुंबई: मुंबई शहर व उपनगरांत सुरू असलेल्या रस्ते कामांचा फटका झाडांना बसू लागला आहे. प्रभादेवी येथे ५० ते ६० झाडांच्या मुळांना रस्ते कामादरम्यान धक्का लागल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित कंत्राटदाराला ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. कामादरम्यान योग्य खबरदारी घेण्यात न आल्याने ३५ ते ४५ वर्षे जुन्या झाडांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून नुकसान झालेल्या झाडांमध्ये सोनमोहर, गुलमोहर, जांभूळ, वड, पिंपळ, भेंडी, अशोकाचा समावेश आहे.
खड्डेमुक्त मुंबईचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महानगरपालिकेने रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच, विहित मुदतीत ही कामे पूर्ण व्हावीत, यासाठी काँक्रिटीकरणाच्या कामांना वेग देण्यात आला आहे. मात्र, काम जलद गतीने पूर्ण करताना अनेकदा रस्त्यालगतच्या झाडांची योग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे हजारो झाडांचे नुकसान होत असल्याची समोर आले आहे. रस्त्याचे खोदकाम करताना योग्य खबरदारी घेतली नसल्याने अनेक ठिकाणी झाडांना धक्का लागला आहे. प्रभादेवी येथे जिवा आत्माराम राऊळ मार्ग, जुना प्रभादेवी मार्ग, वीर स्नातजी लेन, फेमस स्टुडिओ लेन या ठिकाणी महापालिकेतर्फे रस्ते काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत.
त्यादरम्यान रस्त्यांवरील अनेक झाडांचे नुकसान झाले आहे. हरित लवादाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार झाडांच्या १ मीटर परिघात खोदकाम करण्यास मनाई आहे. मात्र, कंत्राटदाराने या नियमाला बगल देऊन रस्त्या लगत असलेल्या झाडांच्या मुळांचे काँिक्रटीकरण केल्यामुळे जवळपास ३५ ते ४५ झाडांना धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी झाडांची मुळे कापली गेली आहेत तर अनेक ठिकाणी ती उघडी पडली आहेत. परिणामी, पावसाळ्यात झाडे उन्मळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. काँक्रीटीकरणादरम्यान झाडांचे नुकसान झाल्याची बाब निदर्शनास येताच संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान विभागाने याबाबत पालिकेच्या रस्ते विभागाला माहिती दिली. तसेच कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्याची सूचना दिली. त्यानुसार रस्ते विभागाने संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावून ५० हजार रुपये दंड ठोठावला. काही दिवसांपूर्वी प्रभादेवी येथे झाडांचे नुकसान झाल्यामुळे कंत्राटदाराला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
३७८ प्रकरणात कंत्राटदारांना नोटीस
रस्त्यांच्या काँक्रीटीकरणादरम्यान झाडांचे नुकसान केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी ३७८ प्रकरणात कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. यात २४१३ झाडांच्या मुळांना धक्का लागल्याचे निदर्शनास आले होते. रस्त्याची कामे सुरू असतानाच अनेक ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याची कामे केली जात आहेत. त्यावेळी रस्ता खोदताना झाडांचे नुकसान झाल्यामुळे संबंधित विभागाला नोटीस बजावण्यात आल्या आहेत. रस्ते कामादरम्यान झाड उन्मळून पडण्याच्या ७ प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.