लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना नाश्ता व दोन वेळचे जेवण रुग्णालयाकडून पुरवले जाते. मात्र राज्यातील सातारा, सांगली, पुणे, सोलापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात जेवण पुरवण्याचे कंत्राट बोगस प्रमाणपत्राच्या आधारे कंत्राटदाराने मिळवले असल्याचे उघडकीस आले आहे. अशा प्रकारे संबंधित कंत्राटदाराने इतर रुग्णालयांमध्येही कंत्राटे मिळवल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आरोग्य विभागांतर्गत असलेले जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या स्तनदा माता व बालके यांच्यासह अन्य रुग्णांसाठी नाश्ता, दूध, फळे व दोन वेळेचे जेवण पुरविण्यात येते. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राट दिले जाते. जेवणाच्या कंत्राटासाठी आरोग्य विभागाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये मोजले जातात. मात्र सातारा, सांगली, पुणे, सोलापूर आणि सिंधुदुर्ग येथील रुग्णालयांमध्ये जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदाराने खोटे अनुभव प्रमाणपत्र जोडून कंत्राट मिळवल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.

यासंदर्भात ‘जय जवान जय किसान संस्थे’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, प्रधान सचिव, संचालक, उपसंचालक यांच्याकडे लेखी तक्रार देऊन संबंधित कंत्राटदाराचे सातारा, सोलापूर, पुणे, सांगली आणि सिंधुदुर्ग येथील कंत्राट रद्द करून त्याला अटक करण्यात यावी, तसेच कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. यासंदर्भात आरोग्य विभागाचे सचिव निपूण विनायक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

प्रकरण उघडकीस कसे आले?

कंत्राटदाराने सातारा, अकोला, लातूर, पुणे आणि वाशिम येथील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सकाच्या कार्यालयातून आहार अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र जोडून कंत्राट मिळवले. या प्रमाणपत्रांसंदर्भात सर्व जिल्हा रुग्णालयातून माहिती अधिकारात माहिती मागविल्यावर संबंधित प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधित कंत्राटदाराविरोधात जळगाव येथील संस्थेने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कंत्राटदाराला अटक करण्यात आली नाही. सरकारची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला अभय का दिले जात आहे. त्यात आरोग्य विभागातील अधिकारी किंवा त्यांच्या नातेवाईकाची कंत्राटदाराशी भागीदारी आहे का, असे प्रश्न जय जवान जय किसान संस्थेकडून उपस्थित करण्यात आले आहेत.

सर्व रुग्णालयातील कंत्राटदारांचे ऑडिट करा

आरोग्य विभागांतर्गत सर्व रुग्णालयांना आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांचे ऑडिट करण्यात यावे. यामध्ये दोषी आढळणाऱ्या आहार पुरवठा कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जय जवान जय किसान सेवा संस्थेने केली आहे.