सेवा कंपन्यांनी मुंबईत खणलेले चर बुजविण्याचे काम पदरात पाडून घेण्यासाठी कंत्राटदारांनी चक्क ३५ ते ४५ टक्के कमी दराने निविदा सादर केल्या असून त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत आतापासूनच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन कंत्राटदारांना ‘चर’ण्यासाठी नवे कुरणच उपलब्ध करून देत असल्याचा आरोप पालिका वर्तुळात होत आहे. याबाबत राजकारण्यांनी नेहमीप्रमाणे मिठाची गुळणी धरली आहे.
वाहतूक नियंत्रक व कॅमेरे उभारणी, परिरक्षण व विद्युतपुरवठा, पदपथांवरील मार्गदर्शक दिव्यांसाठी खोदण्यात येणारे चर तसेच रस्ते विभाग आणि साहाय्यक आयुक्तांच्या सूचनेनुसार खोदलेले चर बुजवून रस्ते पूर्ववत करण्याचे काम कंत्राटदारांवर सोपविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सात परिमंडळांमध्ये कंत्राटदारांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. यासाठी सुमारे १६० जणांनी निविदा खरेदी केल्या. मात्र त्यापैकी ५० जणांनी निविदा भरल्या. हे काम निविदेपेक्षा ४५.४५ टक्के ते ३५.१० टक्के कमी दराने करण्याची तयारी कंत्राटदारांनी दर्शविली असून त्यांनाच हे काम देण्याचा निश्चय प्रशासनाने केला आहे.
या कामासाठी २०१३-१४च्या अर्थसंकल्पात ४४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित खर्च २०१४-१५ आणि २०१५-१६च्या अर्थसंकल्पात करण्यात येणाऱ्या तरतुदीतून भागविण्यात येणार आहे. विविध उपयोगिता सेवा संस्थांकडून खणण्यात आलेले चर पूर्ववत करण्यासाठी येणारा खर्च त्यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या आगाऊ रकमेतून, तसेच दंडात्मक रकमेतून भागविण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.हा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ३० दिवसांत या प्रस्तावास समितीने मंजुरी दिली नाही तर पूर्वमंजुरी मिळाली समजून ही कंत्राटे देण्यात येणार आहेत.
हे आहेत ‘उदार’ कंत्राटदार
पालिकेने बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सने ४५.४५ टक्के, मुकेश ब्रदर्सने ४३.२९ टक्के, श्रीजी कन्स्ट्रक्शन्सने ४२.६० टक्के, के. आर. कन्स्ट्रक्शन्सने ४२.६२ टक्के, बुकॉन इंजिनीअर्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरने ३५.१० टक्के, लॅण्डमार्क कॉर्पोरेशनने ४२.३० टक्के, तर प्रगती एंटरप्रायजेसने ४१.२१ टक्के कमी दराने ही कामे करण्याची तयारी दर्शविली आहे. या कंत्राटदारांना सुमारे ८१ कोटी ४८ लाख ६० हजार रुपयांची कामे देण्यात येणार आहेत.

Story img Loader