वन्यप्राण्यांबद्दल आमच्या मनात प्रेम आहे..त्यांना मारू नये किंवा इजा करू नये यासाठी आम्ही आग्रही असतो..पण हेच वन्यप्राणी आमच्या घराजवळ दिसून येतात..त्यांच्यामुळे आमच्या मुलांच्या जिवाला धोका निर्माण होतो..तेव्हा आमची पहिली जबाबदारी आमच्या मुलांचे संरक्षण हेच असते..बिबटय़ा दिसल्यानंतर आम्ही वनखात्याशी संपर्क करतो..पण त्यांच्याकडून तात्काळ प्रतिसाद मिळत नाही..जीव मुठीत घेऊन राहण्याशिवाय आम्हाला पर्याय नसतो..अशी व्यथा मांडत ठाण्यातील रहिवाशांनी निवासी संकुलांत वावरणाऱ्या बिबटय़ांच्या बंदोबस्ताची आग्रही मागणी रविवारी ठाण्यात केली.
घोडबंदर रोड परिसरातील निवासी संकुलाच्या परिसरात मागील तीन महिन्यांपासून बिबटय़ाचा वावर सुरू झाला आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला वेलिंगटन कॉलनीच्या सुरक्षा कॅमेऱ्यामध्ये त्याची छबी बंदिस्त झाली आणि नागरिकांमध्ये भीती आणखी वाढली. वनखात्याशी संपर्क साधण्यात आला मात्र वनखात्याने दिरंगाई करत दुसऱ्या दिवशी कर्मचारी पाठवले. त्यांच्याकडून देखील नागरिकांचे कोणतेच समाधान झाले नाही. नागरिक आणि माध्यमांनी या विषयाचे गांभीर्य मांडल्यानंतर लोकप्रतिनिधींनी वनखात्यावर दबाव आणला. त्यानंतर बिबटय़ांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वनखात्याने रहिवाशांशी संवाद साधला. रविवारी ठाण्यातील तीन ठिकाणी या बैठकी झाल्या.
प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी आपल्या मनातील अनेक शंका, वनखात्याबद्दलचा संताप आणि सूचनांचा भडीमार येथे वनखात्यांच्या अधिकाऱ्यांवर केला.
बिबटय़ाचा वावर वाढल्यानंतर मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून आजपर्यंत वनखात्याकडून मिळालेला प्रतिसाद हा समाधानकारक नाही. वनखात्याने आपला भ्रमनिरास केला आहे. वनखात्याकडून येणारे कर्मचारीच भेदरलेले असतात त्यांच्याकडून आमच्या संरक्षणाची काय अपेक्षा करणार? त्यांच्याकडे आवश्यक उपकरणे नसल्याने त्यांना वरिष्ठावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आमची भीती दूर करण्याचे कोणतेच उत्तर त्यांच्याकडून मिळत नसल्याचे सांगत रहिवाशांनी वनखात्यावर हल्लाबोल केला.
वनखात्याने या भागात २४ तास गस्त घालावी, तात्काळ मदत मिळेल असे नियंत्रण कक्ष या भागात उभे करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याप्रमाणे मुलांच्या शाळा, खेळण्याची ठिकाणी, उद्याने, रस्त्यावर वनखाते, पोलीस महापालिका, अग्निशमन दलाच्या वतीने योग्य सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी, असे वनखात्यास सुचवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा