‘अजितच्या बेताल वक्तव्यामुळे उठलेल्या वादळानंतर राजीनाम्याबाबत कोणता निर्णय घ्यायचा हे आमदार नव्हे, तर पक्षाची वरिष्ठ यंत्रणा ठरवेल’, असा खरमरीत इशारा देऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात पक्षसंघटनेवरील पकड अजमावण्याच्या अजितदादांच्या मनसुब्यांना वेसण घातली आहे. सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनंतर तडकाफडकी राजीनामा फेकून ‘आपला निर्णय आपणच घेतो’ असे दाखविण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न शरद पवार यांना तेव्हाही मानवला नव्हता. तसे त्यांनी स्पष्टपणे सूचित केले होते. पक्षाध्यक्षांचे ते संकेत धुडकाविणाऱ्या अजित पवार यांना शरदरावांनी जाहीर चपराक लगावल्याने आत्मक्लेशावाचून अन्य पर्यायच अजित पवार यांच्यासमोर उरला नाही, असे पक्षात खाजगीत बोलले जात आहे.
अजित पवार यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली असल्याने आता हा वाद संपवावा असे आवाहन शनिवारी शरद पवार यांनी केल्यानंतर सोमवारपासून विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज सुरळित होईल व राज्यापुढील अनेक महत्वाच्या समस्यांवर गांभीर्याने चर्चा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र अजित पवार यांनी आत्मक्लेशाचे उपोषण सुरू करून विरोधकांना नव्या टीकेची संधी दिल्याचे जाणकारांचे मत आहे.
शरद पवार हे संयमी राजकारणी म्हणून ओळखले जातात. वैचारिक मतभेद असलेल्या अन्य पक्षांतील अनेक नेत्यांशीदेखील त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळेच बेरजेचे राजकारण त्यांना साधता आले, असे राजकीय क्षेत्रात बोलले जाते. पवार यांच्या राजकीय वारसाची चर्चा होते, तेव्हातेव्हा अजित पवार यांचे नाव घेतले जाते. मात्र अजित पवार यांच्या राजकारणाचे हे बेताल पैलू शरद पवार यांच्या राजकारणाशी विसंगत ठरू लागले असून शरद पवार यांनी परिश्रमपूर्वक निर्माण केलेल्या पक्षाच्या प्रतिमेसही अजित पवार यांची वक्तव्ये बाधक ठरू लागल्याचे काही नेत्यांचे मत आहे. अजित पवार यांनी माफी मागितल्यानंतर आता राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर दिलगिरी व्यक्त केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणखी अडचणीत येईल, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना दिलगिरीची संधी न देता आत्मक्लेशाचे उपोषण करून पक्ष व सरकारची प्रतिमा सावरण्याचा निर्णय अजितदादांनी घेतला असावा, असे या नेत्यांचे मत आहे. 

Story img Loader