नवी दिल्लीत नव्याने उभारण्यात आलेल्या व विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या महाराष्ट्र सदनाच्या इमारतीचे उद्घाटन येत्या मंगळवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते होणार आहे. खासगीकरणातून नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाची वास्तू उभारण्यात आली आहे. अंधेरी येथील एक भूखंड ठेकेदाराला देण्यात आला असून त्या बदल्यात ठेकेदाराने नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन, मलबार हिलमधील शासकीय अतिथीगृह बांधून द्यायचे आहे. अंधेरीतील हजार कोटींचा भूखंड अल्प दरात ठेकेदाराला बहाल करण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नापसंती व्यक्त केली होती. एवढे होऊनही महाराष्ट्र सदनाच्या इमारतीचा खर्च वाढल्याबद्दल ठेकेदाराने बोंबाबोंब केली होती. शासनाच्या अटीनुसार ठेकेदाराने काम करणे अपेक्षित असताना खर्च वाढल्यास त्याची सारी जबाबदारी ठेकेदाराची आहे. यावरून सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या आरोप झाले तर भाजपचे कार्यकर्ते किरीट सोमय्या यांनी भुजबळांच्या विरोधात गैरव्यवहारांचा आरोप करीत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. गेले वर्षभर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाची इमारत चर्चेत राहिली असताना आता त्याचे उद्घाटन होत आहे. नवी दिल्लीतील एक भव्य वास्तूमध्ये ही इमारत गणली जाईल, असा राज्य शासनाचा दावा आहे.
महाराष्ट्र सदनाची इमारत वादग्रस्त ठरल्याने महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत ३० तारखेला उद्घाटन उकरण्याचा प्रयत्न होता. गेल्या वर्षी प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. या संदर्भात राष्ट्रपती भवनने महाराष्ट्र शासनाकडे विचारणा केल्याने आता राष्ट्रपतींच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सरकार आणि ठेकेदार यांच्यातील सारे प्रश्न मिटल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Story img Loader