मुंबई : निर्मितीनंतर पहिल्याच प्रयोगासाठी मिळालेला नकार, काही वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रंगभूमीवर निवडक प्रयोग करण्याची संधी आणि पुन्हा वादविवादात अडकल्यामुळे थांबवावे लागलेले नाटक म्हणजे प्रदीप दळवी लिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’. सातत्याने झालेला विरोध पत्करूनही या नाटकाचे आजपावेतो हजार प्रयोग झाले आहेत. सहा वर्षांपूर्वी प्रयोग थांबवण्यात आलेले हे नाटक आता पुन्हा रंगभूमीवर येत आहे.
हेही वाचा >>> मुंबई: ‘व्हॅक्युम क्लीनर’ आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’; नाटकांनी उघडणार यशवंत नाट्यगृहाचा पडदा
अनेकदा राजकीय-सामाजिक विरोध पत्करूनही सातत्याने वाटचाल सुरू ठेवलेल्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे प्रयोग २०१७ साली थांबवण्यात आले होते. आता यंदा ऑक्टोबरमध्ये पुन्हा नव्याने हे नाटक रंगभूमीवर येणार आहे. नव्या नाटकाचे दिग्दर्शन विवेक आपटे करीत असून उदय धुरत हे सादरकर्ते आहेत. तर माऊली नाट्यसंस्थेतर्फे या नाटकाची निर्मिती करण्यात आले आहे. या नाटकाला विविध सामाजिक घटकांकडून तीव्र विरोध झाला असला तरी प्रेक्षकांनी या नाटकाला भरघोस प्रतिसाद दिला. ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ हे नाटक रंगभूमीवर सुरू होते. या नाटकामध्ये शरद पोंक्षे यांनी नथुराम गोडसेंची भूमिका साकारली होती. त्यानंतर आलेल्या ‘हे राम नथुराम’ या नाटकातही शरद पोंक्षे यांनीच ही भूमिका साकारली होती. नव्या नाटकात नथुरामची भूमिका कोण करत आहे? याची उत्सूकता प्रेक्षकांमध्ये आहे.
हेही वाचा >>> मुंबई: इन्स्टाग्रामवरील मित्राकडून अल्पवयीन मुलीचे मॉर्फ छायाचित्र प्रसारित, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
आता काळ बदलला आहे, त्यामुळे आजच्या पिढीला समजेल अशा शब्दांत हे नाटक मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या नाटकाची तीव्रता जशी आहे तशीच पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. हे नाटक येणाऱ्या प्रेक्षकाला १०० टक्के समजेल. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे, असाच प्रतिसाद नव्याने येणाऱ्या नाटकालाही मिळेल अशी अपेक्षा आहे. – विवेक आपटे, दिग्दर्शक